नागपुरात सांडपाणी प्रक्रिया संयंत्राचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:53 AM2020-01-29T00:53:35+5:302020-01-29T00:54:37+5:30
नाल्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करुन निजंर्तुक झालेल्या पाण्याचा वापर बगिच्यात करण्यासाठी महापालिका मुख्यालय परिसरात लावण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया संयंत्राचे लोकार्पण महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते गणतंत्र दिनी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाल्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करुन निजंर्तुक झालेल्या पाण्याचा वापर बगिच्यात करण्यासाठी महापालिका मुख्यालय परिसरात लावण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया संयंत्राचे लोकार्पण महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते गणतंत्र दिनी करण्यात आले.
यावेळी उपमहापौर मनिषा कोठे, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, उपसभापती भगवान मेंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, मनोज गणवीर, राईट वॉटर सोल्युशनचे अभिजित गान आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या समोरून वाहणाऱ्या नाल्यावर हे संयंत्र लावण्यात आले आहे. जपानच्या जोकासु कंपनीचे हे संयंत्र पाच हजार लिटर प्रति दिवस क्षमतेचे आहे. पाण्यावर पुनर्प्रक्रिया आणि त्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने हे संयंत्र उभारण्यात आले आहे. या संयंत्राद्वारे नाल्यातील दूषित पाणी निजंर्तुक करून या पाण्याचा वापर महापालिका परिसरातील बगिच्यात करण्यात येईल. यामुळे पाण्याची आणि विजेची बचत होणार आहे.
नागपूर शहरात असलेल्या नाल्यांवर विविध ठिकाणी असे संयंत्र उभारून क्रीडांगणे, बगिचे व पिण्याव्यतिरिक्त अन्य कामासाठी या पाण्याचा वापर करण्यात येईल, जेणेकरून शुद्ध पाण्याची बचत होईल, असे संदीप जोशी यांनी यावेळी सांगितले. यावेळी मनपाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.