जीवाने मरतात लावे-तितिर, खवैयांना नाही फिकीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:06 AM2020-10-28T00:06:41+5:302020-10-28T00:08:09+5:30
Lave, Titar birds hunting, nagpur news चिमणीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे असणाऱ्या लावे, तितिर पक्ष्यांच्या प्रजातींचे अस्तित्व संकटात सापडले आहे. खवैयांकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मागणीमुळे शहराजवळचे ढाबे भोजनालयांमध्येही तितिर, लाव्यांची अवैध मांसविक्री सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चिमणीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे असणाऱ्या लावे, तितिर पक्ष्यांच्या प्रजातींचे अस्तित्व संकटात सापडले आहे. खवैयांकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मागणीमुळे शहराजवळचे ढाबे भोजनालयांमध्येही तितिर, लाव्यांची अवैध मांसविक्री सुरू आहे. त्यामुळे शिकारीचे प्रमाणही वाढले आहे. माळरानात दिसणारे, भुर्रकन उडणारे हे चिमुकले पक्षी जीववर उठलेल्या संकटाचा सामना करीत आहेत. शेती संपन्नतेवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. महाराष्ट्र राज्यात २१ टक्के जंगल व ५५ टक्केच्यावर कृषी क्षेत्र आहे. या दोन्ही प्रकारच्या अधिवासात लावे, तितिर, बटेर या चिमुकल्या पक्ष्यांचे अस्तित्व आढळून येते. भारतात तितिरच्या सहा प्रजाती तर बटेर पक्ष्याच्या दाेन प्रजाती आढळून येतात. ब्रिटिश काळापासून या पक्ष्यांच्या अस्तित्वावर संशोधन झाले आहे. दरम्यान दीड-दोनशे वर्षापासून वनक्षेत्राच्या आसपास राहणारा समाज उपजीविकेसाठी या पक्ष्यांची शिकार करीत आला आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्यांचा व्यापार वाढला आहे. हा वाढता व्यापार त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र वन्यजीव संवर्धन अधिनियम १९७२ अंतर्गत या पक्ष्यांच्या प्रजातींना संरक्षण प्राप्त आहे, मात्र जंगलाव्यतिरिक्त इतर ठिकाणी सुरक्षा मिळत नाही. त्यामुळे मानवी वस्त्यांजवळ, माळरानावर, डाेंगर माथ्यावर, गवताळ भागात माेठ्या प्रमाणात शिकार करून विक्री हाेते. एखादा शिकारी सापडला तर वनविभागाद्वावारे कारवाई केली जाते पण ते प्रमाण अगदीच नगण्य आहे.
हिवाळा आला की तितिर, लावे या पक्ष्यांची मागणी खवैयांद्वारे माेठ्या प्रमाणात वाढते. या काळात ते काेरडवाहू शेतीकडे येतात. त्यामुळे गावातील आठवडी बाजार, चाैकात आणि घरी त्यांची विक्री केली जाते. मात्र आता तर शहरालगचे ढाबे व भाेजनालयांमध्ये छुप्या पद्धतीने लावे, तितिरची विक्री केली जात असल्याची बाब समाेर येत आहे. मागणी केल्यास तुम्हाला ते आणून दिले जाते. याकडे वनविभाग व पाेलीस यंत्रणेचेही लक्ष नाही. भाेजनालयात मागणी वाढल्याने शिकारही वाढली आहे. त्यामुळे या पक्ष्यांच्या अस्तित्वावर संकट उभे ठाकले आहे.
वनविभागाने माेहीम राबवावी
गेल्या काही वर्षात विदर्भात लावे, तितिर पक्ष्यांची मागणी खवैयांकडून वाढली आहे. वनविभागाची कारवाई क्वचितच हाेते. मात्र या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनविभागाने कारवाई माेहीम राबवावी. काटेकाेर अंमलबजावणीसाठी स्थानिक पक्षिमित्रांची मदत घ्यावी.
यादव तरटे पाटील, पक्षिमित्र