नागपुरात थुंकीबहाद्दरांविरुद्धच्या कारवाईला कायद्याचेही पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:33 PM2020-03-14T23:33:07+5:302020-03-14T23:34:01+5:30
रस्त्यावर थुंकून घाण करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने पुन्हा एकदा जोरदार मोहीम सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावर थुंकून घाण करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने पुन्हा एकदा जोरदार मोहीम सुरू केली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कायद्याचे पाठबळ घेऊन केल्या जाणाऱ्या या मोहिमेत मागील १३ दिवसात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी १३७ जणांना थुंकताना तर २९ जणांना लघवी करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सर्व मिळून ३८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दंड करण्याचा अधिकार
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक अध्यादेश जारी करून त्यांना रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करणे यासाठी दंड करण्याचा अधिकार दिला आहे. महापालिकेने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघवी तसेच घाण करणाऱ्यांवर पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यासाठी झोननिहाय पथक गठित करण्यात आले आहे. पथकाला दोषीवर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे.
मनपा मुख्यालय परिसरातही कारवाई
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार महापालिका मुख्यालय परिसरात थुंकणारे, लघवी करणे व अवैध पार्किंग करणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकामार्फ त कारवाई केली जाते. ३७ कर्मचाऱ्यांना थुंकताना पकडण्यात आले. प्रत्येक झोन कार्यालयाला थुंकणाऱ्ययांच्या विरोधात कारवाई करून दंड वसूल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यांनी कारवाई सुरू केली आहे. दंडात्मक कारवाईचे अधिकार पथकाला देण्यात आल्याची माहिती दासरवार यांनी दिली.