नागपुरात अल्पवयीन आरोपीने कापला युवकाचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:20 PM2018-02-14T23:20:31+5:302018-02-14T23:21:37+5:30
पलंगाखाली लपून बसलेल्या एका अल्पवयीनने आपले बिंग फुटताच युवकावर हल्ला करून त्याचा गळा कापला. ही घटना बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीत घडली. पोलिसांनी हल्लेखोर आरोपीस ताब्यात घेऊन त्याला बाल सुधार गृहात पाठवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पलंगाखाली लपून बसलेल्या एका अल्पवयीनने आपले बिंग फुटताच युवकावर हल्ला करून त्याचा गळा कापला. ही घटना बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीत घडली. पोलिसांनी हल्लेखोर आरोपीस ताब्यात घेऊन त्याला बाल सुधार गृहात पाठवले.
अल्पवयीन आरोपी हा बेलतरोडी पोलीस ठाणे परिसरात राहतो. तो साडेसतरा वर्षाचा आहे. पोलीस सूत्रानुसार जखमी ३५ वर्षी युवक अल्पवयीन आरोपीच्या वस्तीत पत्नीसोबत राहतो. १२ फेब्रुवारी रोजी युवक ड्युटीवरून घरी आला. तो पत्नीसोबत किराणा सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेला. तेथून परत आल्यावर जेवण करून रात्री ९.३० वाजता आपल्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेला. बेडरूममध्ये गेल्यावर त्याला बेडखाली काहीतरी असल्याचा संशय आला. त्याने खाली वाकून पाहिले तेव्हा अल्पवयीन आरोपी दिसून आला. त्याला बेडखाली लपून असल्याचे पाहून युवक संतापला. त्याने त्या आरोपीला पकडले. बेडखाली लपण्याचे कारण विचारले तसेच शेजाऱ्यांना आवाज देऊ लागला. त्यामुळे अल्पवयीन संतापला. त्याने धारदार शस्त्राने युवकाच्या गळ्यावर वार केला. त्याला गंभीर जखमी करून फरार झाला.
घटनेच्यावेळी युवकाची पत्नीही बेडरूममध्ये होती. ती काही करण्यापूर्वीच अल्पवयीन फरार झाला. पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने पतीला रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती होताच बेलतरोडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. युवकाच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने आपले वय २० वर्षे असल्याचे सांगितले. चौकशी केली असता तो अल्पवयीन असल्याचे आढळून आले. या घटनेबाबत कुणीही माहिती द्यायला तयार नव्हता. परिसरात मात्र या प्रकरणाची चर्चा रंगली होती.
षड्यंत्राची शक्यता
अल्पवयीन आरोपीने ज्या पद्धतीने युवकावर हल्ला केला. त्यावरून तो कुठल्यातरी षड्यंत्रांतर्गत युवकाच्या घरी लपून बसला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याने युवकाच्या गळ्यावर वार केला. परंतु हा वार अधिक गंभीर असता आणि वेळीच उपचार मिळाला नसता तर युवकाला वाचविणे शक्य नसते.