विधी वर्तुळात खळबळ : वकिलावर कुऱ्हाडीचे घाव, आरोपीचीही आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 08:49 PM2018-12-21T20:49:05+5:302018-12-22T01:16:28+5:30

नागपूर जिल्हा न्यायालयात वकिली करीत असलेले अ‍ॅड. सदानंद नारनवरे (वय ६२) यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची त्यांच्याच सोबत वकिली करणाऱ्या एका कनिष्ठ वकिलाने हत्येचा प्रयत्न केला. लोकेश भास्कर (वय ३४) असे आरोपीचे नाव असून, त्याने अ‍ॅड. नारनवरे यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर स्वत:ही विष पिऊन आत्महत्या केली. जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या दारासमोर शुक्रवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात काही वेळेसाठी प्रचंड थरार निर्माण झाला होता.

Law enforced: Lawyer suicides | विधी वर्तुळात खळबळ : वकिलावर कुऱ्हाडीचे घाव, आरोपीचीही आत्महत्या

विधी वर्तुळात खळबळ : वकिलावर कुऱ्हाडीचे घाव, आरोपीचीही आत्महत्या

Next
ठळक मुद्देनागपूरच्या जिल्हा न्यायालयासमोर थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्हा न्यायालयात वकिली करीत असलेले अ‍ॅड. सदानंद नारनवरे (वय ६२) यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची त्यांच्याच सोबत वकिली करणाऱ्या एका कनिष्ठ वकिलाने हत्येचा प्रयत्न  केला. लोकेश भास्कर (वय ३४) असे आरोपीचे नाव असून, त्याने अ‍ॅड. नारनवरे यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर स्वत:ही विष पिऊन आत्महत्या केली. जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या दारासमोर शुक्रवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात काही वेळेसाठी प्रचंड थरार निर्माण झाला होता. 


अ‍ॅड. नारनवरे पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमाचे निवृत्त व्याख्याते (एलएलएम) होय. निवृत्तीनंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात प्रॅक्टीस सुरू केली. ते कोर्टातील कामकाज वगळता बराचसा वेळ अन्य काही वकील मित्रांसह राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या दारासमोर फूटपाथवर खुर्ची लावून बसायचे. लोकेश भास्कर हा देखील त्यांच्यासोबत सहकारी (ज्युनिअर) म्हणून काम करायचा. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात ‘नाजूक’मुद्यावरून कुरबूर सुरू होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ४.४५ च्या सुमारास अ‍ॅड. नारनवरे त्यांच्या खुर्चीवर बसून असताना अचानक लोकेशने कुऱ्हाड काढली आणि अ‍ॅड. नारनवरे यांच्या डोक्यावर घाव घातला. एकाच घावात नारनवरे जोरात किंकाळी मारून फूटपाथजवळ पडले. किंकाळी ऐकून आजूबाजूची मंडळी त्यांच्याभोवती गोळा झाली. आरोपी लोकेशच्या हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड होती. त्यामुळे कुणी जवळ येण्याचे धाडस दाखवले नाही. ते पाहून आरोपीने अ‍ॅड. नारनवरे यांच्यावर कुऱ्हाडीचे आणखी घाव घातले. ते रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यानंतर आरोपीने बाजूलाच ठेवलेली विषारी द्रवाची बाटली काढली आणि त्यातील विष प्राशन केले. दरम्यान, अत्यंत संवेदनशील तसेच वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. वकील, कोर्टात तारखेच्या निमित्ताने आलेले आरोपी, पक्षकार आणि त्यांचे नातेवाईक यांनी एकच आरडाओरड केली. ते पाहून बंदोबस्तावर असलेले पोलीस धावले. त्यांनी आरोपी लोकेशला ताब्यात घेतले. त्याच्याजवळची कुऱ्हाड तसेच विषारी द्रवाची बाटली जप्त केली. अत्यवस्थ अवस्थेतील अ‍ॅड. नारनवरे यांना पोलिसांनी वाहनात टाकले. त्यांना तसेच आरोपी लोकेशला पोलिसांनी मेयो हॉस्पिटलमध्ये नेले. 

या थरारक घटनेने विधी वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली. मोठ्या संख्येत वकील मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती कळताच सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. गुन्हे शाखेचाही ताफा आला. त्यांनी घटनेच्या वेळी उपस्थित वकिलांकडून घटनेची माहिती जाणून घेणे सुरू केले. घटना कशी घडली ते अनेकांनी सांगितले. मात्र, का घडली ते सांगायला तयार नव्हते. घटनेचे कारण जाणून घेताना काही जणांनी पत्रकारांना दिलेली माहिती या थरारक प्रकरणाची कोंडी फोडणारी ठरली. त्यानंतर या प्रकरणाला अनैतिक संबंधाचा पैलू जुळला असल्याची माहिती चर्चेला आली.
लोकेशचा मृत्यू , नारनवरे गंभीर
मेयोत दाखल करण्यासाठी नेत असताना वाहनातच आरोपी लोकेशची प्रकृती खालावली. त्यामुळे अ‍ॅड. नारनवरे सोबतच लोकेशलाही अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना लोकेशला डॉक्टरांनी मृत घोषित केले. नारनवरे यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 संशयाने केला घात
मृत्यूशी झुंज देत असलेले अ‍ॅड. सदानंद नारनवरे न्यू सुभेदार ले-आऊटमध्ये राहतात. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात प्रोफेसर होते. तेथेच लोकेश भास्कर विधी अभ्यासक्रमाला शिकत होता. तो मूळचा वडेगाव, तिरोडा ( जि. गोंदिया) येथील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सधन आहे. भाऊ अभियंता  तर बहीण पोलीस दलात कार्यरत असल्याचे समजते. तो पत्नीसह इंदोरा भागात राहत होता. एलएलएम केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी तो जिल्हा न्यायालयात वकिली करू लागला. दोन वर्षांपूर्वी तो नारनवरे यांचा ज्युनिअर म्हणून कोर्टाच्या परिसरात वावरत होता. या दोघांचे कौटुंबिक संबंध दृढ झाल्याने एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. या घटनेनंतर काही वकिलांनी पत्रकारांशी चर्चा करताना अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना घडल्याचे सांगितले. त्यानुसार, काही दिवसांपासून नारनवरे यांच्यासोबत लोकेशच्या पत्नीचा संपर्क वाढला होता. फोनवरही ते सलग संपर्कात होते. ते लक्षात आल्याने लोकेश कमालीचा संतापला होता. नारनवरे त्याला पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. दुसरीकडे त्याच्या पत्नीला नेहमी आर्थिक मदत करीत असल्याचे लक्षात आल्यानेही तो संतापला होता. पत्नीला या संबंधाने समजावले असता ती दाद देत नव्हती तर अ‍ॅड. नारनवरे खेकसल्यासारखे वागत असल्याने त्याचा तिळपापड झाला होता. त्याचमुळे मरण्या-मारण्याच्या इराद्याने लोकेश विष तसेच कुऱ्हाड घेऊन न्यायालयाच्या आवारात पोहचला. नारनवरे यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी त्याने स्वत: विष प्राशन केले आणि नंतर नारनवरेंवर कुऱ्हाडीचे सात ते आठ घाव घातले. 

ते निपचित, तो शांत !
नारनवरे निपचित पडल्याने ते ठार झाल्याचे समजून आरोपी लोकेश उभा झाला. त्याने कुऱ्हाड बाजूला फेकताच आजूबाजूच्या वकिलांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला बदडणे सुरू केले. यावेळी त्याने मारू नका, मी आधीच विष घेतले आहे, असे  सांगितले. त्यामुळे वकिलांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला कोर्टाच्या आवारातील चौकीत बसवले. तेथे एका ज्येष्ठ वकिलांनी त्याला या घटनेमागचे कारण विचारले असता त्याने त्यांना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवल्याचे समजते. दरम्यान, या घटनेने विधी वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली असून, घटनेच्या वेळी तेथे एवढी गर्दी जमली की आकाशवाणी चौक ते जीपीओ चौक या मार्गावरची वाहतूक काही वेळेसाठी रखडली होती. 

Web Title: Law enforced: Lawyer suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.