ट्रान्सपोर्ट माफियांकडून कायद्याची पायमल्ली
By admin | Published: October 2, 2015 07:33 AM2015-10-02T07:33:45+5:302015-10-02T07:33:45+5:30
पोलिसांच्या संरक्षणामुळे निर्ढावलेले खासगी ट्रान्सपोर्ट माफिया व त्यांनी पोसलेल्या गुंडांद्वारे गणेशपेठ मध्यवर्ती
नागपूर : पोलिसांच्या संरक्षणामुळे निर्ढावलेले खासगी ट्रान्सपोर्ट माफिया व त्यांनी पोसलेल्या गुंडांद्वारे गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळील जाधव चौकात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात असल्याची तक्रार पीडित नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी गुरुवारी गृह विभाग सचिवांसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने पीडित नागरिकांच्या पत्राची जनहित याचिका म्हणून दखल घेऊन अॅड. हरनीश गढिया यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. अॅड. गढिया यांनी नियमानुसार याचिका दाखल केली आहे. याचिकेतील अन्य प्रतिवादींमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, विभागीय नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे. जाधव चौकात काही गुंडांनी धाक निर्माण केला आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांची ताकद प्रचंड वाढली आहे. या परिसरातून जाणाऱ्या महिला व तरुणींची छेड काढली जाते. विरोध करणाऱ्यांना मारहाण केली जाते. उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करून जाधव चौकात सर्रास खासगी वाहतूक सुरू आहे. येथून रोज गोंदिया, पवनी, लाखांदूर, ब्रह्मपुरी,वडसा, आरमोरी, गडचिरोली, अर्जुनी, साकोली, हिंगणघाट, वर्धा, वणी, वरोरा, चंद्रपूर इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या १८० ते २०० खासगी ट्रॅव्हल्स सुटतात. ट्रॅव्हल्स मालकांनी पोसलेले गुंड २० टक्के कमिशनवर वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांपुढे प्रवाशांचे बुकिंग करतात. काही गुंडांनी खासगी बस चालकांकडून प्रत्येकी ५० रुपये वसुली करून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे. ही रक्कम ते गरजूंना व्याजाने कर्ज देण्यासाठी वापरतात, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच, प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी १० हजार रुपये पाठविण्यात आले आहेत. या रकमेतून जाधव चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावून परिस्थितीचे निरीक्षण करावे, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)