लोकांना बौद्ध धम्मात जाण्यापासून रोखण्यासाठीच ‘लव्ह जिहाद’चा कायदा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:04 AM2020-12-28T04:04:37+5:302020-12-28T04:04:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशात मोठ्या प्रमाणावर लोक बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत. लोकांना विशेषत: मागासवर्गीयांना बौद्ध धम्माकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात मोठ्या प्रमाणावर लोक बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत. लोकांना विशेषत: मागासवर्गीयांना बौद्ध धम्माकडे जाण्यापासून रोखण्यासाठीच ‘लव्ह जिहाद’चा कायदा आणण्यात आला असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.
मुस्लीम समाजातील मुले हिंदू मुलींना आपल्या प्रेम जाळात अडकवून त्यांना मुस्लीम बनवतात, असे भाजप व संघ विचारधारेतील लोक नेहमी सांगत असतात. याला त्यांनी ‘लव्ह जिहाद’ असे नावसुद्धा दिले आहे. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने लव्ह जिहादचा कायदाही केला आहे. यासंदर्भात राजरत्न आंबेडकर यांनी मात्र लव्ह जिहादचा मुस्लिमांशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारणाऱ्यांची संख्या अपवाद सोडली तर फारशी दिसून येत नाही. उलट बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे हजारोंच्या संख्येने आढळून येतात. अलीकडेच हाथरस हत्याकांड घडले. त्यातील पीडित वाल्मीकी समाजातील ५० सदस्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे केवळ ५० लोकच होते परंतु ही घटना मोठी होती. वाल्मीकी समाज शेड्यूल कास्ट हिंदू असून तो पारंपरिक सामाजिक रचनेत नेहमीच आपण म्हणून तसे वागणारा आज आपला धर्म सोडून जात असल्याने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला मोठा धक्का बसला. त्यामुळेच त्यांनी तडकाफडकी हा कायदा आणल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी राजाभाऊ टाकसाळे उपस्थित हाेते.
बॉक्स
शेतकऱ्यांचे आंदोलन हे लोकशाही वाचवण्यासाठी
केंद्राने केलेला कायदा हा शेतकरी विरोधातच नव्हे तर तो संविधानाच्या विरोधातही आहे. कारण शेती हा राज्याचा विषय असून केंद्राने यात हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे आता केंद्र सरकारविरोधात नाही तर ते एकूणच देशाची लोकशाही वाचवण्यासाठी सुरू आहे.
त्यामुळे हे आंदोलन प्रत्येक नागरिकाचे आंदोलन आहे. देशातीलच नव्हे तर जगभरातील बौद्ध व आंबेडकरी समाज या आंदोलकांसोबत आहे, असेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.