नागपुरातील अंबाझरी तलावात उडी घेऊन वकिलाची आत्महत्या; कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 06:05 PM2022-05-26T18:05:12+5:302022-05-26T18:15:33+5:30
खिशातील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली. कुटुंबीयांना याची माहिती कळविण्यात आली. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली, या कारणांचा शोध सुरू आहे.
नागपूर : शहरातील वकील ॲड. प्रवीण तपासे यांनी अंबाझरी तलावात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे विधिजगतात खळबळ उडाली असून, नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली, या कारणांचा शोध सुरू आहे.
ॲड. तपासे यांनी बुधवारी रात्री अंबाझरी तलावात उडी घेतली. नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही बाब तेथे उपस्थित असलेल्यांच्या लक्षात आल्यानंतर, पोलिसांना सूचना करण्यात आली. अग्निशमन विभागाच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. खिशातील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली. कुटुंबीयांना याची माहिती कळविण्यात आली. तपासे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात पोलीस आणखी तपास करीत आहेत. तपासे हे सिव्हील मॅटर्सची काम पाहायचे. याशिवाय ते नोटरीदेखील होते.
मानसिक तणाव की आर्थिक अडचण ?
यासंदर्भात त्यांच्या निकटवर्तीयांजवळ पोलिसांनी विचारणा केली. ते चंदननगर येथील रहिवासी होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती काही वेळा खराब झाली होती. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. कोणतीही सुसाईड नोट त्यांनी लिहिली नसल्यामुळे पोलीस विविध शक्यतांच्या आधारावर तपास करीत आहेत.