वकील पिता-पुत्राने केला ज्येष्ठ नागरिकाचा खून
By दयानंद पाईकराव | Published: May 27, 2024 03:52 PM2024-05-27T15:52:44+5:302024-05-27T15:53:16+5:30
आरोपींना अटक : आरोपी-मृतक नेहमीच सोबत प्यायचे दारू
नागपूर : नेहमीच एकमेकांसोबत दारु पिणाऱ्या वकील आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये दारु पिताना वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि वकील व त्याच्या मुलाने कोणत्यातरी वस्तुने मारून ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा खून केला. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ११ वाजता ते मध्यरात्री २.३० वाजताच्या दरम्यान घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी वकील व त्याच्या मुलाला अटक केली आहे.
अश्वीन मधुकर वासनिक (५६) आणि अविष्कार अश्वीन वासनिक (२३) दोघे रा. अंबादे आटा चक्कीजवळ, मोठा बुद्ध विहार, इंदोरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर हरिष दिवाकर कराडे (६०, रा. प्लॉट नं. ५५५, हुडको कॉलनी, जरीपटका) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. कराडे हे ऑर्डनन्स फॅक्ट्रीतून सेवानिवृत्त झाले आहेत. आरोपी वकील अश्वीन आणि मृतक हरिष कराडे हे पूर्वी एकाच गल्लीत रहायचे. त्यानंतर वासनिक इंदोरात रहायला गेला. परंतु आरोपी वकील व मृतक हरिष कराडे यांना सोबत दारु प्यायची सवय होती. ते नेहमीच रात्री उशीरापर्यंत दारु पित बसत होते. रविवारी रात्री हरिष कराडे आरोपी वकील अश्वीनच्या घरी गेले. तेथे दोघांनी रात्री ११ ते २.३० पर्यंत सोबत दारु घेतली. परंतु त्यांच्या कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. वादाचे रुपांतर शिविगाळीत झाले. त्यानंतर आरोपी वकील अश्वीन आणि त्याचा मुलगा अविष्कारने कोणत्यातरी वस्तुने मारून हरिष कराडे यांचा खून केला. या प्रकरणी हरिष कराडे यांची पत्नी सोनाली हरिष कराडे (३०, रा. हुडको कॉलनी जरीपटका) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका ठाण्याचे उपनिरीक्षक मारोती जांगीलवाड यांनी आरोपी वकील अश्वीन आणि त्याच्या मुलाविरुद्ध कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.
सहा महिन्यापूर्वी झाले होते लग्न
हरिष कराडे ऑर्डनन्स फॅक्ट्रीतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना दारुचे व्यसन होते. सहा महिन्यापूर्वी त्यांनी राजस्थानमधील एका ३० वर्षीय घटस्फोटीत महिलेशी लग्न केले होते. त्या महिलेला एक मुलगीही आहे. सर्व काही सुरळीत सुरु असताना कराडे यांचा खून झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.