वकील महिलेची तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:15 PM2019-10-01T23:15:49+5:302019-10-01T23:25:09+5:30
हुडकेश्वरमध्ये राहणाऱ्या एका वकील महिलेने घरगुती वादातून पतीसमोरच तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वरमध्ये राहणाऱ्या एका वकील महिलेने घरगुती वादातून पतीसमोरच तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सोनाली अमरदीप रंगारी (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप तसेच उलटसुलट चर्चा होत असल्यामुळे गुन्ह्याचे स्वरूप ठरविण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी वृत्त लिहिस्तोवर चर्चा करीत होेते.
हुडकेश्वरमधील आनंदविहार कॉलनीमध्ये राहणाºया सोनाली यांचे माहेर मुंबईला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. त्यांना जुळी मुले (मुलगा, मुलगी) आहेत. त्या स्वत: आणि त्यांचे पती अमरदीप रंगारी वकील आहेत. मुले झाल्यानंतर सोनाली यांनी न्यायालयात जाणे बंद केले. दरम्यान, पती अमरदीप रंगारी अलीकडे आपल्याकडे व्यवस्थित लक्ष देत नसल्याची भावना सोनालीची झाली होती. त्यावरून पती-पत्नीत खटके उडायचे. त्यांनी आनंद विहार कॉलनीत घेतलेल्या सदनिकेचे दोन दिवसांपूर्वीच वास्तुपूजन केले होते. अनेक नातेवाईक या कार्यक्रमाला आले होते. त्यातील काही मुक्कामीही होते. नातेवाईकांसमोरच पती-पत्नीमधील विसंवाद उघड झाला होता. या पार्श्वभूमीवर, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोनाली आणि त्यांचे पती अमरदीप सदनिकेच्या गॅलरीत चर्चा करीत होते. या चर्चेला वादाचे स्वरूप आले. मोठमोठ्याने बोलणे सुरू असताना सोनाली यांनी तिसºया माळयावरून उडी मारली. जोरदार किंकाळी ऐकू आल्याने नातेवाईक तसेच शेजारी धावले. त्यांनी सोनालींना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेची माहिती कळताच हुडकेश्वरचे पोलीस अधिकारी तसेच सहायक पोलीस आयुक्त आनंद विहार कॉलनीकडे धावले. नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांनीही घटनेची माहिती जाणून घेतली. सोनाली यांचे माहेर मुंबईचे आहे. माहेरची मंडळी पोहचण्याला उशीर झाल्यामुळे तसेच प्रकरण संशयास्पद असल्यामुळे पोलिसांनी तपासाची पुढील प्रक्रिया थांबवली. सोनालीची माहेरची मंडळी आल्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरवू, असे हुडकेश्वर पोलीस सांगत होते. तूर्त पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
... अन्यथा भावाकडे जाईल !
पोलिसांच्या माहितीनुसार, सोनाली पतीपासून दुखावल्या होत्या. पतीने मनासारखे वागावे, असा त्यांचा आग्रह होता. त्या त्यांना वारंवार भावाकडे निघून जाईल, असे म्हणत होत्या. सोनालीच्या भावाने काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केल्याचे समजते. सोनालीचा तो इशारा सरळ सरळ आत्मघाताचा होता. त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे दोन चिमुकल्यांची मायेची उब कायमची हिरावली गेली आहे.