वकील महिलेची सासरच्यांविरुद्ध छळाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:11+5:302021-08-01T04:09:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - नामवंत कुटुंबाशी संबंधित असलेल्या आणि स्वत:ही वकील असलेल्या करिश्मा गवई - दरोकर यांनी पती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - नामवंत कुटुंबाशी संबंधित असलेल्या आणि स्वत:ही वकील असलेल्या करिश्मा गवई - दरोकर यांनी पती तसेच सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणात तीन दिवसांपूर्वी हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून महिलेच्या सासू-सासऱ्यांसोबत त्यांच्या दोन नातेवाइकांनाही अटक केली. मुख्य आरोपी (तक्रारदार महिलेचा पती) मात्र फरार आहे.
पोलिसांकडून प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आलेल्या मात्र, शहरातील सामाजिक क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणातील आरोपीचे नाव पलाश पुरुषोत्तम दरोकर (वय २२) असे आहे. तो विधी शाखेचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे पोलीस सांगतात. फिर्यादी करिश्मा (वय ३४) स्वत: वकील असून, त्या विधी महाविद्यालयात प्रोफेसर असल्याचे समजते. तेथे शिकायला असलेल्या पलाशसोबत त्यांचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी गेल्या वर्षी प्रेमविवाह केला. प्रेमविवाहानंतर आरोपी पती पलाश आणि त्याचे वडील पुरुषोत्तम दरोकर, सासू ललिता तसेच दोन मामा संजय आणि प्रशांत टोंगसे (सर्व रा. सद्भावनानगर, ओंकारनगर) शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन छळ करू लागले. त्यामुळे करिश्मा यांनी तीन दिवसांपूर्वी सीताबर्डी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. हुंड्यासाठी छळ करताना आरोपी नवरा, सासू-सासरे आणि नवऱ्याचे दोन मामा जातिवाचक शिवीगाळ करीत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. प्रकरण हायप्रोफाइल असल्याने सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणात हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला. एसीपी तृप्ती जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
---
सोमवारी सुनावणी
पोलिसांनी या प्रकरणात पलाश वगळता अन्य आरोपींना अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगीही करण्यात आली. मात्र, त्याची वाच्यता होऊ नये म्हणून कमालीची गोपनीयता बाळगली. अखेर शनिवारी हे प्रकरण चर्चेला आले. दरम्यान, पलाशने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर २ ऑगस्टला सुनावणी असल्याचे समजते.
----