'वकिलांनी शॉर्टकट मार्गाचा अवलंब करू नये'; नागपूरकर हायकोर्ट न्यायमूर्तींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2023 08:47 PM2023-02-23T20:47:10+5:302023-02-23T20:47:43+5:30
Nagpur News जीवनात चिरकाल टिकणारे यश संपादित करायचे असेल, तर अथक परिश्रम घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे विचार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती यानशिवराज खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
नागपूर : नवोदित वकिलांनी पुढे जाण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा अवलंब करू नये. जीवनात चिरकाल टिकणारे यश संपादित करायचे असेल, तर अथक परिश्रम घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे विचार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती यानशिवराज खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
जिल्हा वकील संघटनेच्या वतीने गुरुवारी उच्च न्यायालयातील नागपूरकर न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर, न्या. अनिल पानसरे, न्या. यानशिवराज खोब्रागडे व न्या. वृषाली जोशी यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. त्यानंतर न्या. खोब्रागडे यांनी सर्वांच्या वतीने सत्काराला उत्तर देताना नवोदित वकिलांना यशाचा कानमंत्र दिला. न्या. अविनाश घरोटे व न्या. अनिल किलोर कामाच्या व्यस्ततेमुळे कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचा सत्कार पुढील नियोजनानुसार केला जाणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा व सत्र न्यायालयातील सभागृहात सायंकाळी पार पडला. कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश एम. एस. आझमी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित हाेते.
केवळ कायद्याची पदवी मिळवून परिपूर्ण वकील होता येत नाही. त्यासाठी न्यायालयात प्रत्यक्ष काम करणे आवश्यक असते. दरम्यान, नवोदित वकिलांनी वरिष्ठ वकिलांचा युक्तिवाद ऐकला पाहिजे. पुरावे नोंदविण्याच्या आणि साक्षीदारांची सरतपासणी व उलटतपासणी घेण्याच्या प्रक्रियेचे सूक्ष्म निरीक्षण केले पाहिजे. वाचन वाढविले पाहिजे, असे न्या. खोब्रागडे यांनी पुढे बोलताना सांगितले. याशिवाय त्यांनी स्वत:च्या जीवनातील खडतर प्रवासाची आणि प्रेरणादायी यशाची माहितीही वकिलांना दिली. संघटनेचे अध्यक्ष ॲड. रोशन बागडे यांनी प्रास्ताविक केले तर महासचिव ॲड. मनीष रणदिवे यांनी आभार मानले. ॲड. उषा गुजर, ॲड. आशिष नागपुरे, ॲड. संदीप बावनगडे, ॲड. वासुदेव कापसे, ॲड. श्रीकांत गावंडे, ॲड. मनोज मेंढे, ॲड. सौरभ पोद्दार, ॲड. विक्रांत भोयर, ॲड. श्रेय बांगडे, ॲड. राजेश मानमोडे, ॲड. तेजस दाढे, ॲड. श्रीकांत येडलेवार, ॲड. अनिल कावरे, ॲड. चांडोक गुरप्रीत, ॲड. मो. नावीद ओपई आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.