दोन न्यायमूर्तींचे मुख्यालय बदलल्याने वकिलांत नाराजी; हायकोर्ट बार असोसिएशन हरकतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 02:18 PM2022-09-23T14:18:38+5:302022-09-23T14:22:31+5:30
नागपूर खंडपीठात सध्या १३ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. दि. ३ ऑक्टोबरपासून केवळ ११ न्यायमूर्ती कार्यरत राहतील. परिणामी, नागपूर खंडपीठाचे कामकाज प्रभावित होईल. न्यायदानाचा वेग कमी होईल, असे वकिलांचे म्हणणे आहे.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती मनीष पितळे व न्यायमूर्ती अमित बोरकर यांचे नागपूर मुख्यालय बदलवून मुंबई करण्यात आले आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी यासंदर्भात गुरुवारी आदेश जारी केला. या आदेशामुळे वकील वर्गामध्ये नाराजी पसरली आहे.
न्या. पितळे यांची दि. ५ जून २०१७ तर, न्या. बोरकर यांची दि. १४ जानेवारी २०२० रोजी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षांनंतर त्यांना सेवेत कायम करण्यात आले. दोन्ही न्यायमूर्ती सुरुवातीपासूनच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांचे मुख्यालय बदलण्याचा आदेश वकिलांना रुचला नाही. हा आदेश येत्या दि. ३ ऑक्टोबरपासून अंमलात येणार नाही. या आदेशामुळे नागपूर खंडपीठाचे मोठे नुकसान होईल.
नागपूर खंडपीठात सध्या १३ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. दि. ३ ऑक्टोबरपासून केवळ ११ न्यायमूर्ती कार्यरत राहतील. परिणामी, नागपूर खंडपीठाचे कामकाज प्रभावित होईल. न्यायदानाचा वेग कमी होईल, असे वकिलांचे म्हणणे आहे. हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांनी या आदेशाचा विरोध केला जाईल, अशी माहिती 'लोकमत'शी बोलताना दिली. यासंदर्भात कार्यकारी समितीच्या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.