दुसऱ्याच्या जमिनीवर ले-आऊट टाकले
By admin | Published: September 18, 2016 02:45 AM2016-09-18T02:45:23+5:302016-09-18T02:45:23+5:30
एका महिलेच्या मालकीच्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून त्या जमिनीवर ले-आऊट टाकून सहा आरोपींनी तेथील लाखोंचे भूखंड परस्पर विकून टाकले.
कोट्यवधींचे भूखंड परस्पर विकले : कळमन्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : एका महिलेच्या मालकीच्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून त्या जमिनीवर ले-आऊट टाकून सहा आरोपींनी तेथील लाखोंचे भूखंड परस्पर विकून टाकले. भरतवाडा, कळमना भागात घडलेल्या या बनवाबनवीचा प्रकार तब्बल ३० वर्षांनंतर उघडकीस आला.
कळमन्यातील भरतवाडा हनुमान मंदिराजवळ कांताबाई कृष्णराव काळे (वय ६५) यांची जमीन (खसरा क्र. ९११) आहे. या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून आरोपी अविनाश धैर्यशील काकडे, ओमप्रकाश धैर्यशील काकडे, विजय पंजाबराव गांवडे, आशिष प्रभाकर भुजबळ (सर्व रा. अंबाझरी वर्मा ले-आऊट), सचिन सारंगधर नत्थुजी इंगळे तसेच बाळकृष्ण लहानुजी तेलंग (अध्यक्ष, रा. विनोबा भावे नगर पारडी) यांनी त्या जमिनीवर ले-आऊट टाकले. त्यानंतर येथील भूखंड लोकांना परस्पर विकून टाकले. अशा प्रकारे मूळ जमीनमालक काळे यांना अंधारात ठेवून आरोपींनी कोट्यवधी रुपये हडपले.
२६ जुलै १९८५ ते १५ मे २०१५ या कालावधीत घडलेली ही बनवाबनवी कांताबाई कृष्णराव काळे यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर कळमना पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)