नागपूर विद्यापीठाचा लेटलतिफपणा ; अद्यापी ‘राव’च राज्यपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:13 AM2019-09-11T11:13:13+5:302019-09-11T11:13:35+5:30
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी झाला असताना नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मात्र अद्यापही चे. विद्यासागर राव हेच राज्यपाल असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लेटलतिफपणा अद्यापही कायमच आहे. आता तर चक्क विद्यापीठाच्या कुलपतींसंदर्भातच विद्यापीठाने हलगर्जीपणा दाखविला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांचा शपथविधी झाला असताना संकेतस्थळावर मात्र अद्यापही चे. विद्यासागर राव हेच राज्यपाल असल्याचे दिसून येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संकेतस्थळासंदर्भात वारंवार गंभीर चुका होत असतानादेखील प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई होताना दिसून येत नाही.
राज्याचे राज्यपाल हेच विद्यापीठाचे कुलपती असतात. चे. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ ३ सप्टेंबर रोजीच पूर्ण झाला व त्यांना निरोपदेखील देण्यात आला. तर ५ सप्टेंबर रोजी भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाची शपथ घेतली. त्यानंतर सहा दिवस उलटून गेल्यानंतरदेखील विद्यापीठ प्रशासनाला जाग आलेली नाही. अद्यापही विद्यासागर राव यांचेच नाव कुलपती म्हणून मुख्य पृष्ठावरच दिसून येत आहे. ‘लोकमत’ने याअगोदर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील विविध त्रुटी समोर आणल्या आहेत. यात विद्यापीठाकडून उशिराने सुधारणा करण्यात आली. मात्र वारंवार असे प्रकार दिसून येत आहेत. यासंदर्भातील अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
खटी अद्यापही परीक्षा व मूल्यमापन संचालक
संकेतस्थळावर अनेक चुका अद्यापही कायम आहे. डॉ. नीरज खटी यांनी परीक्षा व मूल्यमापन संचालकपदाचा राजीनामा देऊन अनेक महिने झाले. गेल्या काही महिन्यांपासून डॉ. अनिल हिरेखण यांच्याकडे या विभागाची जबाबदारी आहे. संकेतस्थळावर मात्र अद्यापही डॉ. नीरज खटी हेच परीक्षा व मूल्यमापन संचालक असल्याचे दाखविण्यात येत आहे.