धावत्या रेल्वेगाडीतील मृत्यूचा तपास ‘एलसीबी’कडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 09:25 PM2018-08-22T21:25:15+5:302018-08-22T21:26:02+5:30
दोन दिवसांपूर्वी एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसमध्ये एका महिला आणि पुरुषाच्या झालेल्या मृत्युप्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) सोपविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसांपूर्वी एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसमध्ये एका महिला आणि पुरुषाच्या झालेल्या मृत्युप्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) सोपविण्यात आला आहे.
तामिळनाडू येथे आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या एका महिला आणि पुरुषाचा नागपूर ते नरखेड दरम्यान धावत्या रेल्वेगाडीत सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला होता. दोघेही लाखो रुपये आणि सोने घेऊन पलायन करीत असल्याची सूचना रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर दोघांची तपासणी केली. परंतु त्यांच्याजवळ आक्षेपार्ह काहीच आढळले नाही. दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने तामिळनाडू पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. आरपीएफचे जवान गाडीतच होते. प्रवासात दोघाही प्रवाशांनी लाडू खाल्ल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास लोहमार्ग पोलीस सहायक निरीक्षक एम. एन. शेख यांच्याकडे देण्यात आला. मंगळवारी सायंकाळी तामिळनाडूचे पोलीस नागपुरात पोहोचले. त्यांनी या घटनेबाबत चौकशी केली. दरम्यान घटना गंभीर असल्यामुळे या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अभय पान्हेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दोघांचेही मृतदेह मेयो रुग्णालयात शीतगृहात ठेवले असून मृतदेह सात दिवस शीतगृहात ठेवण्याची विनंती रुग्णालय प्रशासनाला केली आहे. सात दिवसात मृतांचे नातेवाईक न आल्यास लोहमार्ग पोलिसांतर्फे दोघावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बेशुद्धावस्थेतील रेल्वे प्रवाशाचा मृत्यू
रेल्वेस्थानकावर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या प्रवाशाला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना सकाळी ९ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. घनश्याम खुशाल गडे (४५, रा. साकरे ले-आऊट, भंडारा) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ते नांदेडला रजिस्ट्रार कार्यालयात कार्यरत होते. मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसने ते भंडाऱ्याला जात होते. सकाळी ९ वाजता विदर्भ एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. अस्वस्थ वाटत असल्यामुळे ते सिमेंटच्या बाकड्यावर झोपले. बराच वेळ होऊनही ते हालचाल करीत नसल्याची माहिती प्रवाशांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात दिली. रेल्वे डॉक्टरांनी तपासून त्यांना मेयो रुग्णालयात पाठविले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्याजवळ आढळलेल्या मोबाईल क्रमांकावरून त्यांची ओळख पटली. तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
बर्थवर चाळे करणारे अल्पवयीन लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये १६ वर्षाची मुलगी आणि १७ वर्षाचा मुलगा प्रवास करीत होते. बर्थवरच त्यांचे चाळे सुरू होते. प्रवाशांनी ही माहिती गाडीतील टीटीईला दिली. टीटीईने लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच या अल्पवयीन मुला-मुलीला गाडीखाली उतरविले.
रेल्वेगाडी क्रमांक १२८६० गीतांजली एक्स्प्रेसमध्ये १६ वर्षाची मुलगी कविता आणि १७ वर्षाचा राजेश (बदललेले नाव) प्रवास करीत होते. दोघेही अल्पवयीन असून ते झारखंडचे रहिवासी आहेत. राजेशने दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून, कविता नवव्या वर्गात शिकत आहे. एकाच भागात राहत असल्यामुळे त्यांचे एकमेकांवर प्रेम जुळले. त्यांनी पुढील आयुष्य सोबत घालविण्याचा निर्णय घेऊन घरून पळून जाण्याचे ठरविले. सोमवारी सकाळी ते घरून निघाले. नागपुरात गाडी बदलवून सिकंदराबादला नातेवाईकांकडे ते जाणार होते. गोंदिया रेल्वेस्थानकाजवळ गाडी असताना ते बर्थवर चाळे करताना प्रवाशांच्या दृष्टीस पडले. अल्पवयीन असल्यामुळे ते घरून पळून जात असावेत, असा अंदाज प्रवाशांना आला. लागलीच प्रवाशांनी याबाबत गाडीतील टीटीईला सूचना दिली. टीटीईने लोहमार्ग पोलिसांना कळविले. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच लोहमार्ग पोलिसांनी या दोघांनाही गाडीखाली उतरविले. मुलीला शासकीय मुलींच्या वसतिगृहात पाठविण्यात आले तर राजेश लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे. रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी दोघांच्याही कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे.