तेलकामठी शिवारातील क्रिकेट सट्ट्यावर ’एलसीबी’ची धाड, दाेघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 05:17 PM2023-07-11T17:17:57+5:302023-07-11T17:18:15+5:30
६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : सावनेर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील तेलकामठी (ता. कळमेश्वर) शिवारातील फार्म हाउसमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने शनिवारी (दि. ८) रात्री धाड टाकली. यात बांगलादेश-अफगाणिस्तान दरम्यान खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारणाऱ्या दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ६१ हजार ५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली.
दीपक शंकर गाेस्वामी (३४, रा. वर्धमाननगर, नागपूर) व कुणाल बबन धापाेडकर (३४, रा. मस्कासाथ, इतवारी, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. बांगलादेशात सध्या बांगलादेश आणि अफगाणिस्तान दरम्यान द्विपक्षीय एकदिवसीय क्रिकेट सामने सुरू आहेत. मीरपूर (बांगलादेश) येथे शनिवारी (दि. ८) या दाेन्ही संघांदरम्यान खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर तेलकामठी शिवारातील एका फार्म हाउसमध्ये सट्टा स्वीकारला जात असल्याची माहिती एलसीबीच्या पाेलिस अधिकाकऱ्यांना प्राप्त झाली हाेती. त्यामुळे एलसीबीच्या पथकाने त्या फार्म हाउसचा शाेध घेत आत बनावट ग्राहक पाठविला. दाेघेही सट्टा स्वीकारत असल्याचे स्पष्ट हाेताच त्या ग्राहकाने सूचना केली आणि एलसीबीच्या पथकाने लगेच धाड टाकली.
यात पाेलिसांनी सट्टा स्वीकारणाऱ्या दीपक व कुणाल या दाेघांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ४० हजार रुपयांचे १० माेबाइल फाेन, ११ हजार रुपयांचा टॅब, ४,००५ रुपयांचे सट्टा स्वीकारणे व नाेंदवून ठेवण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ६१ हजार ००५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दाेन्ही आराेपींच्या विराेधात सावनेर पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवून त्यांना पुढील तपासासाठी सावनेर पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पाेलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पाेलिस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे, सहायक पाेलिस निरीक्षक राजीव कर्मलवार व आशिषसिंग ठाकूर, सहायक फाैजदार चंद्रशेखर गडेकर, राजेंद्र रेवतकर, अमाेल कुथे, किशाेर वानखेडे, आशिष मुंगले, उमेश फुलबेल, राहुल साबळे, सावनेरचे ठाणेदार रवींद्र मानकर, गणेश राय, रवी मेश्राम, सचिन लाेणारे यांच्या पथकाने केली.