बनावट सुगंधित तंबाखू कारखान्यावर ‘एलसीबी’ची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2022 08:47 PM2022-11-21T20:47:24+5:302022-11-21T21:00:39+5:30
Nagpur News स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने खापा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी नजीकच्या वेलतूर शिवारात असलेल्या बनावट सुगंधित तंबाखू कारखान्यावर रविवारी (दि. २०) रात्री धाड टाकली.
नागपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने खापा (ता. सावनेर) पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी नजीकच्या वेलतूर शिवारात असलेल्या बनावट सुगंधित तंबाखू कारखान्यावर रविवारी (दि. २०) रात्री धाड टाकली. यात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण १८ लाख ९३ हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील मुख्य आराेपी फरार असून, त्याचा शाेध सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली.
दुर्गेश विजय अग्रवाल (३१, रा. ओल्ड मानकापूर, नागपूर) असे फरार असलेल्या मुख्य आराेपीचे नाव असून, अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये आलंद बालाजी वडीचार (५३, रा. दुर्गानगर, कळमना, नागपूर), राकेश रामेश्वर निनावे (३२, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) व विजय प्रभाकर डुमरे (४६, रा. भरतवाडा राेड, पारडी, नागपूर) या तिघांचा समावेश आहे.
पाटणसावंगी नजीकच्या वेलतूर (ता. सावनेर) शिवारातील शिवाजी रामचंद्र वाठ यांच्या शेतात बनावट सुगंधित तंबाखू कारखाना असून, तिथे तंबाखूचे पॅकिंग केले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पाेलिस अधिकाऱ्यांना प्राप्त झाली हाेती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाहणी करून नियाेजनबद्ध धाड टाकली. या धाडीत पाेलिसांच्या हाती कारखान्यातील तीन कामगार लागल्याने त्यांना अटक करण्यात आली.
या कारवाईमध्ये ७ लाख १० हजार ६०० रुपयांचे माजा कंपनीचे रिकामे डबे, तंबाखूत मिसळले जाणारे शिशे, हुक्का, तंबाखू, १६ लाख २२ हजार २२५ रुपयांची विना लेबलची खुली तंबाखू, १० हजार रुपयांचे तंबाखू भरण्यासाठी वापरले जाणारे डबे व त्यांची झाकणे, तीन हजार रुपयांचे डबे ठेवण्यासाठी वापरले जाणारे खरड्याचे डबे, ६० हजार रुपयांच्या दाेन पॅकिंग मशीन, एक हजार रुपयांचे पॅकिंग टेप बंडल, २० हजार रुपयांची पाेती शिवण्यासाठी वापरली जाणारी शिलाई मशीन, १५ हजार रुपयांचा इलेक्ट्राॅनिक वजनकाटा, १० हजार रुपयांचे रिकामे पाऊच, ४० हजार रुपयांची डब्यांवर दिनांक व बॅच नंबर छापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दाेन मशीन, सहा हजार रुपयांच्या दाेेन लाेखंडी काेठ्या असा एकूण १८ लाख ९३ हजार २२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे, सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, हवालदार राजेंद्र रेवतकर, राेशन काळे, आशिष मुंगळे, किशाेर वानखेडे, उमेश फुलबेल यांच्या पथकाने केली.
महिनाभरापासून उत्पादन
हा कारखाना मागील महिनाभरापासून सुरू हाेता. या ठिकाणी आठवड्यातील तीन ते चार दिवस तंबाखूचे पॅकिंग केले जायचे. मुख्य आराेपी दुर्गेश अग्रवाल हा पाेत्यांमध्ये साधा तंबाखू घेऊन यायचा आणि पॅकिंग केलेला सुगंधित तंबाखू घेऊन जायचा. ताे हा बनावट सुगंधित तंबाखू नागपूर शहर व परिसरात विकत असावा, अशी माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.
अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या सूचना
ही कारवाई करण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न व औषधी प्रशासन विभागाला सूचना दिली हाेती. धाड टाकून साहित्य जप्त केल्यानंतर पुढील तपास खापा (ता. सावनेर) पाेलिसांकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी खापा पाेलिसांनी भादंवि ३२८, २७३, २७२, १८८ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नाेंदविला आहे.