‘वेदांता’चे बुटीबोरीत एलसीडी पॅनल युनिट
By admin | Published: December 23, 2015 03:49 AM2015-12-23T03:49:40+5:302015-12-23T03:49:40+5:30
अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह तायवान येथील एयू आॅप्ट्रानिक्स कॉर्पोरेशनच्या सहयोगाने नागपुरातील बुटीबोरी इंडस्ट्रीज एरियात एलसीडी पॅनल युनिट लवकरच सुरू करणार आहे.
तायवान कंपनीशी करार :
१० हजार कोटींची गुंतवणूक
सोपान पांढरीपांडे ल्ल नागपूर
अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह तायवान येथील एयू आॅप्ट्रानिक्स कॉर्पोरेशनच्या सहयोगाने नागपुरातील बुटीबोरी इंडस्ट्रीज एरियात एलसीडी पॅनल युनिट लवकरच सुरू करणार आहे. या प्रकल्पात १० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.
एयू आॅप्ट्रानिक्स कॉर्पोरेशनचे सहसंचालक पावेन ली आणि वेदांता समूहाचे अमोघ अग्रवाल आणि प्रकल्प व्यवस्थापक पंकज प्रियदर्शनी यांनी बुटीबोरी इंडस्ट्रीज एरियातील पायाभूत सुविधांची पाहणी केली. यावेळी एमआयडीसीचे विभागीय अधिकारी जे. बी. संगीतराव उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निमंत्रणावरून गुंतवणूकदारांनी बुटीबोरी येथील साईटला भेट दिली. हे युनिट २०० एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २०० मेगावॅट वीज आणि प्रक्रियायुक्त पाण्याची गरज भासणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एमआयडीच्या अधिकाऱ्यांनी जुन्या बुटीबोरी इंडस्ट्रीज परिसरासह राष्ट्रीय महामार्ग-७ येथील चंद्रपूर मार्गावरील बुटीबोरी-२ विस्तारीकरणाची जागा दाखविली. बुटीबोरी इंडस्ट्रीज परिसराला पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या नंद सिंचन जलाशयाची पाहणी केली आणि तेथील पाण्याचे नमुने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. समूहाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी आरआयएल-एडीएजी समूहाच्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पालाही भेट देऊन पाहणी केली. व्हीआयपीएलतर्फे सध्या ६०० मेगावॅट विजेची निर्मिती करते. गुंतवणूकदार समूहाला आवश्यक २०० मेगावॅट विजेचा पुरवठा करण्याची कंपनीने तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले.
समूहाच्या अधिकाऱ्यांची विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याची तयारी होती, पण वेळेअभावी त्यांची भेट होऊ शकली नाही. पुढील दौऱ्यात नक्की भेटू, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे यांनी लोकमतला सांगितले.