रामटेक तालुक्यात पाच पक्षांची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:39+5:302021-06-28T04:07:39+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यात एक जिल्हा परिषद व तीन पंचायत समिती सर्कलसाठी पाेटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यात एक जिल्हा परिषद व तीन पंचायत समिती सर्कलसाठी पाेटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी पाच पक्षांनी एकत्र येत आघाडी केल्याची माहिती रविवारी (दि. २७) रामटेक शहरात आयाेजित पत्रपरिषदेत देण्यात आली. या आघाडीमध्ये प्रहार, गाेंडवाना गणतंत्र पार्टी, बीआरएसपी, माकपा व भाकपा या पाच पक्षांचा समावेश आहे.
तालुक्यातील बाेथिया-पालाेरा जिल्हा परिषद सर्कल आणि नगरधन, मनसर व उमरी या तीन पंचायत समिती गणांच्या पाेटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत या चारही जागांवर काॅंग्रेसचे उमेदवार विजयी झाले हाेते. सध्याची निवडणूक काॅंग्रेस व शिवसेना एकत्र येऊन लढतात की स्वतंत्रपणे लढतात, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
या आघाडीच्यावतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १६ आणि पंचायत समितीच्या ३१ जागा लढविण्यात येणार असल्याचेही प्रहार संघटनेचे रमेश कारामाेरे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला गाेंगपाचे हरीश उईके, बीआरएसपीचे विशेष फुटाणे, माकपाचे राजू हटवार, भाकपाचे ॲड. आनंद गजभिये उपस्थित हाेते.
...
तिहेरी लढतीची शक्यता
या पाच पक्षांच्या आघाडीमुळे काँग्रेस व शिवसेना अशी नवी आघाडी हाेण्याची शक्यताही राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. ही आघाडी झाल्यास शिवसेनेचा उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात. भाजप स्वतंत्र लढणार असल्याने या चारही ठिकाणी तिहेरी लढत हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.