जि.प.च्या विरोधी पक्षनेत्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:25 AM2021-01-08T04:25:26+5:302021-01-08T04:25:26+5:30
महालगावात भाजपचा विजयाचा चौकार की होणार परिवर्तन सुदाम राखडे कामठी : नागपूर-भंडारा मार्गावर वसलेल्या कामठी तालुक्यातील महालगाव ग्रा.पं.मध्ये यावेळी ...
महालगावात भाजपचा विजयाचा चौकार की होणार परिवर्तन
सुदाम राखडे
कामठी : नागपूर-भंडारा मार्गावर वसलेल्या कामठी तालुक्यातील महालगाव ग्रा.पं.मध्ये यावेळी महाविकास आघाडीने परिवर्तनाचा संकल्प दिला आहे. ११ सदस्यीय असलेल्या या ग्रा.पं.मध्ये विकास कामांच्या बळावर सत्ताधारी भाजप समर्थित पॅनेलने येथे विजयाचा चौकार मारण्याचा निर्धार केला आहे. महालगाव ग्रा.पं.च्या ११ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात उभे असले तरी येथे थेट टक्कर भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडी आणि महाविकास आघाडी समर्थित ग्रामविकास महाआघाडी पॅनेलमध्ये आहे. या ग्रा.पं.साठी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महालगाव- आसोली गट ग्रामपंचायत आहे. आसोली हे निधान यांचे होम टाऊन आहे. यावेळी येथे सत्ताधारी गटाला धक्का देण्यासाठी ग्राम विकास महाआघाडीने कंबर कसली आहे. येथे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश ढोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र काही वॉर्डात महाविकास आघाडी समर्थकांना संधी न मिळाल्याने त्यांनी वेगळी चूल मांडली आहे. याचा फटका नेमका कुणाला बसतो हे १८ जानेवारी रोजीच स्पष्ट होईल. येथे वॉर्ड क्रमांक १ मधून आदर्श ग्रामविकास पॅनेलकडून माजी सरपंच व विद्यमान सदस्य शेषराव वानखेडे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात ग्रामविकास महाआघाडी परिवर्तन पॅनेलने अनिल ठाकरे यांना संधी दिली आहे. या वॉर्डातील इतर दोन जागांसाठी उपरोक्त दोन्ही पॅनेलमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे.
वॉर्ड क्रमांक दोनमध्ये निधान यांचे थोरले बंधू माजी उपसरपंच भगवान निधान मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात ग्रामविकास महाआघाडी परिवर्तन पॅनलचे रामकृष्ण घाटोळे यांना संधी दिली आहे. येथे अपक्ष विष्णू शिंदेमेश्राम रिंगणात उतरले आहेत. येथे इतर दोन जागांसाठी चुरशीची लढत होईल.
वॉर्ड क्रमांक ३ मध्ये आदर्श ग्रामविकास पॅनेलच्या संगीता रोटे आणि ग्रामविकास महाविकास आघाडी परिवर्तनच्या निर्मला इंगोले यांच्यात सामना होईल. या वॉर्डातील दुसऱ्या जागेकरिता दोन उमेदवारात थेट लढत होणार आहे.
वॉर्ड क्रमांक ४ मध्ये आदर्श ग्रामविकास पॅनेलकडून विद्यमान सदस्य आत्माराम ठाकरे रिंगणात असून त्यांच्याविरोधात अनिल दहेकर तर अपक्ष म्हणून सोपान बोबडे रिंगणात आहेत.
अशी आहे महालगाव ग्रा.पं.
महालगाव हे नागपूर-भंडारा मार्गानजीक वसलेले आहे. या ग्रामपंचायत क्षेत्रात अंतर्गत काही मोठ्या कंपन्या वसल्या आहेत. या कंपन्यांकडून मिळणारा कर ग्रा.पं.च्या महसुलात महत्त्वाची भूमिका वठवितो.
-
वॉर्ड : ४
एकूण सदस्य : ११
एकूण उमेदवार : २७
एकूण मतदार : २२८८
पुरुष उमेदवार : १२१७
महिला मतदार : १०७१