नेते व पदाधिकाऱ्यांचे फोन होताहेत टॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:07 AM2020-07-28T00:07:45+5:302020-07-28T00:10:00+5:30
आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोधी पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोधी पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
खोपडे यांचे म्हणणे आहे, यासंदर्भात एका अज्ञात व्यक्तीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे की, विरोधी पक्षातील नेत्यांचे व पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप होत आहेत. विशेषकरून भाजपचे. खोपडेंनी या पत्राला गंभीरतेने घेऊन, यात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. हा नंबर राज्यातील एका मंत्र्याच्या भाच्याचा निघाला. त्यामुळे खोपडे यांचा संशय आणखी वाढला. पत्रात म्हटले की विरोधी पक्षाच्या नेत्यांचे मोबाईल फोन व सीडीआर काढण्यात येत आहे. मोबाईल ट्रॅकरच्या साहाय्याने मोबाईलचे संभाषण रेकॉर्ड केले जात आहे. यासाठी पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. खोपडे यांनी प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पोलीस करीत आहेत चौकशी
खोपडे यांच्या तक्रारीवर पोलीस सतर्क झाले आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार पत्रात दिलेल्या नंबरचा तपास करण्यात येत आहे. सायबर सेलच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.