नेते कार्यक्रमाला येत नाहीत... मग आम्हीच मंचावरील अतिथी; नाथजोगी समाजाचा आक्रमक पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 09:36 PM2022-11-24T21:36:32+5:302022-11-24T21:37:07+5:30

Nagpur News नाथजोगी समाजमेळाव्यास भाजपचा एकही नेता न आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी गोंधळ घातला.

Leaders don't come to the event... then we are the guests on the stage; Aggressive attitude of Nathjogi community | नेते कार्यक्रमाला येत नाहीत... मग आम्हीच मंचावरील अतिथी; नाथजोगी समाजाचा आक्रमक पवित्रा

नेते कार्यक्रमाला येत नाहीत... मग आम्हीच मंचावरील अतिथी; नाथजोगी समाजाचा आक्रमक पवित्रा

Next
ठळक मुद्दे मेळाव्याला भाजपचा एकही नेता न आल्याने संताप, सुरेश भट सभागृहात तणाव

नागपूर : राजकीय नेत्यांना एखाद्या कार्यक्रमाला बोलविणे ही तशी तारेवरची कसरतच असते. काही राजकीय नेते आश्वासन देऊनही कार्यक्रमाला येत नाहीत आणि आयोजक मनातल्या मनात चरफडत वेळ टाळून नेतात. मात्र, शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या नाथजोगी समाजाने गुरुवारी नागपुरात अशा राजकीय नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम केले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एकही नेता न आल्याने उपस्थित व आयोजकांच्या संयमाचा बांध सुटला. सार्वजनिकपणे याविषयी संताप व्यक्त तर झालाच, मात्र त्याहून पुढे जात काहींनी थेट मंचावर धाव घेतली. नेते येत नाहीत तर आपणच मंचावरील अतिथी असे म्हणत जोपर्यंत पाहुणे येणार नाहीत तोपर्यंत सभागृह सोडणारच नाही, अशी भूमिका घेतली.

नाथजोगी समाजातर्फे कविवर्य सुरेश भट सभागृहात समाजबांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना निमंत्रित करण्यात आले होते. या नेत्यांनी समाजातील पदाधिकाऱ्यांना होकारदेखील दिला होता. या कार्यक्रमाची वेळ १२ वाजताची होती. मात्र, दोन वाजेपर्यंत एकही अतिथी पोहोचले नाहीत. यामुळे उपस्थितांसह आयोजकदेखील संतप्त झाले. महाराष्ट्र नाथजोगी समाजाचे अध्यक्ष दशरथ सावंत (पांडे महाराज) हे मंचावर पोहोचले व तेथूनच त्यांनी नेत्यांविरोधात आक्रमक भाषण सुरू केले. यानंतर समोरील अनेकजण मंचावर पोहोचले व अतिथींच्या खुर्च्यांवर जाऊन बसले. त्यांच्यातील लोकांनीच भाषणे देण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे दुपारपर्यंत सभागृह परिसरात तणावाचे वातावरण होते. महाराष्ट्रातील विविध भागातून लोक या मेळाव्याला आले होते व अनेकांनी निषेध म्हणून सायंकाळपर्यंत जेवणदेखील केले नाही.

गडकरींनी अगोदर फोन व नंतर प्रत्यक्ष साधला संवाद

सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोक सभागृहात होते. नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच स्पीकर फोनच्या माध्यमातून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. हा प्रकार कळल्यावर त्यांनी शिष्टमंडळाला बोलावून घेतले व त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. सर्व समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

स्थानिक नेत्यांवर जास्त संताप

समाजाचे अध्यक्ष दशरथ सावंत (पांडे महाराज) यांनी सर्वांच्या संतापाचे कारण सांगितले. नितीन गडकरी प्रकृती ठीक नसतानादेखील आम्हाला भेटले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत बैठका असल्याने येऊ शकले नाहीत. मंत्र्यांचे आम्ही समजू शकतो. मात्र, नागपूर जिल्ह्यातील भाजपचा एकही आमदार कार्यक्रमाला फिरकला नाही ही गोष्ट निश्चितच दुखावणारी होती. गडकरींनी स्वत:हून फोन करून प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. मात्र, इतर नेत्यांचीही प्रकृती खराब झाली होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Leaders don't come to the event... then we are the guests on the stage; Aggressive attitude of Nathjogi community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.