दिल्लीवारीत आघाडीवर, आंदोलनाकडे मात्र पाठ

By admin | Published: April 13, 2017 03:12 AM2017-04-13T03:12:23+5:302017-04-13T03:12:23+5:30

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिल्ली गाठली. नागपुरात लक्ष द्या, तेथे काँग्रेस मजबूत करा,

Leading to Delhi | दिल्लीवारीत आघाडीवर, आंदोलनाकडे मात्र पाठ

दिल्लीवारीत आघाडीवर, आंदोलनाकडे मात्र पाठ

Next

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी अनुभवली गटबाजी : कशी होणार काँग्रेस बळकट?
नागपूर : दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिल्ली गाठली. नागपुरात लक्ष द्या, तेथे काँग्रेस मजबूत करा, असे साकडे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना घातले. मात्र, दिल्लीहून नागपुरात परतताच त्याच नेत्यांनी पक्षाच्या कार्यक्रमापेक्षा गटबाजीला अधिक महत्व दिल्याचे दिसून आले. महाराष्ट्राचे भूमिपुत्र कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात नागपुरात प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मात्र, दिल्लीवारीत पुढाकार घेणाऱ्या नेत्यांनी राष्ट्रीय हिताच्या या आंदोलनाकडे पाठ फिरवत गटबाजीलाच अधिक महत्व दिल्याचे दिसून आले.
पाकिस्तान विरोधात देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. भूमिपुत्राच्या बचावासाठी प्रदेश काँग्रेस मदतीसाठी धावली. बुधवारी राज्यभर स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी नागपुरात येत व्हेरायटी चौकात ही मोहीम राबिवली. शहर काँग्रेसचे पदाधिकारी व बहुतांश नगरसेवकांसह कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले. मात्र, दिल्लीवारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना स्वगृही होत असलेल्या पक्षाच्या या कार्यक्रमाचा विसर पडल्याचे पहायला मिळाले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेत दिल्लीवारी करणारे पदाधिकारी आघाडीवर होते. संघर्षयात्रा व्हेरायटी चौकातही आली होती. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे नागपुरात तीन तास असूनही व्हेरायटी चौकातील आंदोलनाला आले नव्हते.
त्या नाराजीतून तर दिल्लीवारी करणारे नेते बुधवारी चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या स्वाक्षरी मोहिमेत अनुपस्थित राहिले नाहीत ना, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. खरेतर महाराष्ट्राच्या पुत्रासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत सर्वांनीच राजकीय मतभेद बाजूला सारून उपस्थित राहणे आवश्यक होते. पण तसे झाले नाहीत.
गेल्यावेळी संघर्षयात्रेच्या कार्यक्रमात अनुपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे या वेळी उपस्थित होते. तर माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी हे गेल्यावेळी व आताही अनुपस्थित होते.
नागपुरातील काँग्रेस नेते आता कोणत्याही परिस्थिती एकत्र येण्यास तयार नाहीत, असेच काहीसे चित्र या दोन्ही आंदोलनावरून पुढे आले आहे. सर्वच राजकीय पक्षात मतभेद आहेत. परंतु इतर पक्षात कार्यक्रम असला की आपसातील मतभेद बाजूला सारून सर्वजण एकत्र येतात. काँग्रेसमध्ये मात्र दरी वाढतच चालली आहे. एकीकडे पक्ष बळकट करण्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करायची व दुसरीकडे पक्षाच्या आंदोलनाला दांडी मारायची, ही परिस्थिती नागपुरात प्रदेशाध्यक्षांना अनुभवायला मिळाली. (प्रतिनिधी)

Web Title: Leading to Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.