उपराजधानीत शिका सुरक्षित ‘ड्रायव्हिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:26 PM2019-07-31T12:26:50+5:302019-07-31T12:29:11+5:30
उपराजधानीतील वाहनचालकांना सुरक्षित वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील वाहनचालकांना सुरक्षित वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘आयडीटीआर’साठी (इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अॅन्ड रिसर्च) जागा देण्यास राज्य शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. गोधनी येथे २० एकर जागेमध्ये ही संस्था उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून ही संस्था येथे येणार आहे. ‘आयडीटीआर’च्या माध्यमातून मंत्रालयाच्या सुरक्षित ‘ड्रायव्हिंग’च्या मोहिमेला ‘बूस्ट’ मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पुण्यातील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्ट’अंतर्गत नागपुरात ही संस्था स्थापन करण्यात येत आहे. या संस्थेच्या उभारणीसाठी नागपुरात विविध जागांची चाचपणी करण्यात आली होती व अखेर गोधनी येथील २० एकर जागेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली व ही जागा वार्षिक एक रुपये भुईभाडे दराने देण्यास मान्यता देण्यात आली. ही जागा ‘आयडीटीआर’ला ३० वर्षांच्या भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून सुरक्षित वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
‘आयडीटीआर’मध्ये महिन्याला ३०० वाहनचालकांना प्रशिक्षण देण्यात येईल. येथे वाहतूक प्रशिक्षणासंदर्भात अत्याधुनिक व्यवस्था राहणार आहे. यात ऑडिओ-व्हिज्युअल सुविधेसह ‘ड्रायव्हिंग लेबॉरेटरी’चा समावेश असेल. येथे ‘ड्रायव्हिंग सिम्युलेटर्स’देखील असतील.
सुरक्षित वाहने चालविण्याचा येईल आत्मविश्वास
चारचाकी वाहन चालविण्याचे पक्के लायसन्स असूनही मुख्य रस्त्यांवर व वाहतुकीच्या वर्दळीत वाहन चालविण्याचा आत्मविश्वास अनेकांकडे नसतो. अशा व्यक्तींना योग्य प्रशिक्षण मिळावे व त्यांना आत्मविश्वास यावा यासाठी ‘आयडीटीआर’ची मौलिक भूमिका राहणार आहे. ‘आयडीटीआर’च्या ट्रॅकवर सफाईदारपणे गाडी चालविली म्हणजे मुख्य रस्त्यांवर व गर्दीतही सहज गाडी चालविता येईल, असा विश्वास वाहन चालकांना वाटतो. पुण्यातील भोसरी येथे अनेक वाहनचालक प्रशिक्षणासाठी येतात. नागपुरातदेखील आता वाहनचालकांसाठी असा पर्याय उपलब्ध होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना चारचाकी वाहनांच्या पक्क्या लायसन्सच्या चाचणीसाठी पुण्यातील ‘आयडीटीआर’ला जावे लागते.