यूपीएससीमध्ये बदलापूर्वी विद्यार्थ्यांचे मत जाणून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:52 AM2018-06-17T00:52:22+5:302018-06-17T00:52:33+5:30
पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करून युपीएससीच्या परीक्षा स्वरुपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय कें द्र शासनाने घेतला आहे. मात्र यूपीएससीच्या स्वरूपात बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचेही मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत तरुणांनी व्यक्त केले आहे. माय करिअर आणि स्वयम्तर्फे विदर्भामध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर समोर आलेला निष्कर्ष स्वयम्चे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी पत्रपरिषदेत मांडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करून युपीएससीच्या परीक्षा स्वरुपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय कें द्र शासनाने घेतला आहे. मात्र यूपीएससीच्या स्वरूपात बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचेही मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत तरुणांनी व्यक्त केले आहे. माय करिअर आणि स्वयम्तर्फे विदर्भामध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर समोर आलेला निष्कर्ष स्वयम्चे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी पत्रपरिषदेत मांडला.
केंद्र शासनाने सुचविलेल्या बदलानुसार यूपीएससीची लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवारांना फाऊंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतरच प्रशासकीय सेवेत कॅडर मिळणार आहे. केंद्राने आणखीही बदल सुचविलेले आहेत. या निर्णयावर स्वयम्तर्फे संपूर्ण विदर्भात सर्वेक्षण करण्यात आल्याचे मुत्तेमवार यांनी सांगितले. या सर्वेक्षणानंतर आलेला निष्कर्ष त्यांनी मांडला. यानुसार ५५.४५ टक्के तरुणांनी यूपीएससीत बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे तर २०.११ टक्के तरुणांनी एखाद्या समितीचे नेमणूक करण्याचे मत व्यक्त केले. ६८.५६ टक्के तरुणांना वाटते की, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच गुणांच्या आधारावर उमेदवारांना कॅडर मिळावे तर १८.७९ टक्के तरुणांनी ट्रेनिंगनंतर कॅडर मिळण्याचे मत व्यक्त केले आहे. फाऊंडेशन कोर्सनंतर कॅडर देण्याच्या प्रक्रियेमुळे परीक्षेत अव्वल गुण मिळविलेल्या उमेदवारांवर अन्याय होईल, असे ५३.६२ टक्के तरुणांना वाटते, मात्र २३.३९ टक्के तरुण या प्रक्रियेमुळे कौशल्यप्राप्त उमेदवारांची निवड होईल, असे मत व्यक्त करतात.
ज्या अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार यूपीएससीत बदल करण्याची सुचना पंतप्रधान कार्यालयाने केली, त्या अग्रवाल समितीबाबत ६३.२१ टक्के तरुण अनभिज्ञ असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. केवळ १३.३१ टक्के तरुणांनी या समितीबाबत माहिती असल्याचे सांगितले. ३१.६० टक्के तरुणांना यूपीएससीच्या प्रचलित स्वरुपात बदल नकोय तर ४०.२२ टक्के तरुणांनी काही प्रमाणात बदल करण्याचे मत व्यक्त केले आहे. २०.४० टक्के तरुणांना बदल आवश्यक वाटतो. सर्व्हेनुसार नागरी सेवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ८१.६० टक्के लोकांनी पुस्तकी व व्यावहारिक ज्ञानाला प्राधान्य दिले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग स्वतंत्र असावा असे ५०.४८ टक्के तरुणांना वाटते तर ३६.४९ टक्के तरुण केंद्राचे नियंत्रण व ९.४८ टक्के तरुण राज्य शासनाचे नियंत्रण ठेवण्याची सूचना करीत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत असल्याचे विशाल मुत्तेमवार यांनी सांगितले. पत्रपरिषदेत स्वयम्चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.