सातव यांच्या रूपाने अभ्यासू नेता हरविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:51+5:302021-05-17T04:07:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील पक्षनेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सातव यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील पक्षनेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सातव यांच्या रूपात पक्षाने अभ्यासू व कार्यशील नेता हरविला असल्याची भावना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. विशेषत: युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सातव यांच्या निधनावर भाजप नेत्यांनीदेखील शोक प्रकट केला आहे.
राज्याच्या राजकारणाची हानी
युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री
क्षमतावान युवा नेतृत्व हरविले
राजीव सातव यांनी अवघ्या काही वर्षातच देश पातळीवर आपली वेगळी प्रतिमा तयार केली होती. पक्षाच्या संघटनेमध्ये सरचिटणीस, गुजरात राज्याचे प्रभारी म्हणून प्रामाणिकपणे काम करणारा एक दूरदृष्टीचा युवा नेता काँग्रेस पक्षाने गमावला आहे. राष्ट्रीय पातळीवर मोठी भूमिका बजाविण्याची क्षमता असलेले महाराष्ट्रातील हे नेतृत्व काळाने आमच्यातून हिरावून नेले आहे. काँग्रेस पक्षाने एक उमदा व उज्ज्वल भविष्य असणारा नेता गमावला आहे.
- नितीन राऊत, ऊर्जामंत्री, महाराष्ट्र
पक्षीय चौकटीबाहेरील उमदे व्यक्तिमत्त्व गेले
राजीव सातव म्हणजे प्रत्येकाशी मैत्री ठेवत, पक्षीय चौकटीच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवणारे एक उमदे आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. जनहिताच्या अनेक प्रश्नात आम्ही एकत्रित येऊन संघर्ष केला आहे. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे अतिशय वेदनादायी आहे.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा