सर्वाधिक स्लम असलेल्या उत्तर नागपुरात पट्टेवाटप ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:09 AM2021-09-21T04:09:02+5:302021-09-21T04:09:02+5:30
मंजुरीनंतरही वाटप नाही : ६,४६५ अर्ज प्रलंबित शहरातील एकूण ४२६ झोपडपट्ट्या : २९९ घोषित १२७ अघोषित ...
मंजुरीनंतरही वाटप नाही : ६,४६५ अर्ज प्रलंबित
शहरातील एकूण ४२६ झोपडपट्ट्या : २९९ घोषित १२७ अघोषित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात पाच हजारांवर झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या घराच्या जमिनीचे मालकीपट्टे रजिस्ट्रीसह मिळाले आहेत. मात्र, शहरात सर्वाधिक १०१ झोपडपट्ट्या असलेल्या उत्तर नागपुरात पट्टे वाटप प्रक्रिया जवळपास ठप्प आहे.
शहरात ४२६ झोपडपट्ट्या आहेत. यातील २९९ घोषित, तर १२७ अघोषित झोपडपट्ट्या आहेत. उत्तर नागपुरात १०१ असून, त्यातील ५९ घोषित, तर ४२ अघोषित आहेत. दक्षिण - पश्चिममध्ये ७४पैकी ५० घोषित, पश्चिममध्ये ८४ पैकी ५२ घोषित, दक्षिणमधील ४५पैकी ३४ घोषित, मध्यमध्ये ६८पैकी ६० घोषित, पूर्वमध्ये ५४पैकी ४४ झोपडपट्ट्या घोषित आहेत. अधिकृत झोपडपट्ट्यांमधील पात्र रहिवाशांना मालकी पट्टे वाटप करण्याचे सरकारचे धोरण आहे.
नासुप्रच्या जमिनीवर ६७, शासकीय जमिनीवर ७०, नागपूर महापालिकेच्या जमिनीवर १६ झोपडपट्ट्या आहेत. खासगी व मिश्र मालकीच्या जमिनीवर इतर झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. नासुप्रच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक ३,३८१ पट्टे वाटप झालेले आहे. दक्षिण विभागात २४३०, पूर्व मध्ये ७७९, पश्चिममध्ये ७८, तर उत्तर विभागात ९४ पट्ट्यांचे वाटप झालेले आहे. प्रन्यासचा उत्तर विभाग यात मागे आहे.
झोपडपट्टीवासीयांची प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक, राजकुमार वंजारी, डॉ. दिलीप तांबटकर, रामदास उईके, विमल बुलबुले, शैलेंद्र वासनिक आदींनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
...
येथील पट्टेवाटप थांबले
नासुप्रच्या जमिनीवरील आनंद नगर, राहुल नगर, लष्करीबाग, पंचशीलनगर, कस्तुरबा नगर, इंदिरानगर, धम्मदीप नगर, संतोष नगर, नझुल जागेवरील पंचशीलनगर, बिनाखी, इंदोरा, नवीन इंदोरा, मोठा इंदोरा, बेझनबाग, श्रावस्ती नगर, खोब्रागडे नगर, ताज नगर लुंबिनीनगर, धम्मदीप नगर, लष्करीबाग, तक्षिलानगर या झोपडपट्टयांचा समावेश आहे. उत्तरमधील इंदोरा-२, इंदोरा-४, रिपब्लिकन नगर व श्रावस्ती नगर प्रकरणे मंजूर असूनही वाटप नाही. त्यातील इंदिरा नगर येथील ५१, तर कस्तुरबा नगरातील ४२ रहिवाशांनाच पट्टे वाटप झाले.
...
२८,०७९ घरांचे सर्वेक्षण
शहरातील अनेक झोपडपट्ट्यांत सर्वेक्षणाचे काम झाले आहे. त्यात २८,०७९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात उत्तर नागपुरातील व त्यांमधील ११,००५ घरांचा समावेश आहे. उत्तर नागपुरातील २८ वस्त्यांमध्ये पीटीएस (प्लेन टेबल सर्वे), तर २७ वस्त्यांमध्ये एसईएस (सोशो - इकोनॉमिक सर्वे) झालेले आहे. शहरात सर्वेक्षण झालेल्या सरकारी जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांचे १४,०४५ अर्ज व दस्तऐवज जिल्हाधिकारी कार्यालय, नझूलमध्ये प्रलंबित आहे.
....
असे झाले पट्टेवाटप
मनपाच्या जमिनीवरील १६ झोपडपट्टी वसाहतींमध्ये १,५५० रहिवाशांना पट्टे वाटप झालेले आहे. त्यात मतदारसंघनिहाय दक्षिण - पश्चिम ५९४, पश्चिम - २३७, पूर्व - २८८, मध्य - ४११ पट्टयांचा समावेश आहे. उत्तर नागपुरात एकाही पट्ट्याचे वाटप झालेले नाही. शासकीय - नझूल जमिनीवरील ७० झोपडपट्ट्यांपैकी ३० वस्त्या उत्तर नागपुरातील आहेत.
..
उत्तर नागपूर उपेक्षितच !
मालकी पट्टे वाटप प्रक्रियेत उत्तर नागपूर माघारले आहे. बेझनबाग भागातील बेझनबाग- १मधील १९२, तर बेझनबाग - २ या झोपडपट्टी वसाहतीतील १,१७० रहिवाशांचे अर्ज व दस्तऐवज जिल्हाधिकारी - नझूल कार्यालयात तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. येथे एकही पट्टा वितरित झालेला नाही. पालकमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन शहरातील स्लम भागातील नागरिकांना न्याय द्यावा.
-अनिल वासनिक, संयोजक, शहर विकास मंच