नागपूरनजीकच्या रामटेक भागात बस उलटून २० विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:32 PM2017-11-24T22:32:10+5:302017-11-24T22:37:44+5:30

शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेली एसटी बस रामटेक-मौदा मार्गावरील मौदा टी पॉर्इंट परिसरात उलटून २० विद्यार्थी जखमी झाले.

At least 20 students were injured in a bus mishap in Ramtek area of ​​Nagpur | नागपूरनजीकच्या रामटेक भागात बस उलटून २० विद्यार्थी जखमी

नागपूरनजीकच्या रामटेक भागात बस उलटून २० विद्यार्थी जखमी

Next
ठळक मुद्देचालक होता दारूच्या नशेतबस भरधाव

आॅनलाईन लोकमत
नागपूर : शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेली एसटी बसचालकाचा ताबा सुटल्याने रोडच्या कडेला उलटली. त्यात २० विद्यार्थी जखमी झाले. जखमींना उपचारार्थ रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अपघात होताच बसचालक बस सोडून पळून गेला. तो दारूच्या नशेत असल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली. ही घटना रामटेक-मौदा मार्गावरील मौदा टी पॉर्इंट परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली.
जखमींमध्ये श्रृतिका शेंडे (१७), आयुष लेंडे (१२), कुणाल खोडणकर (१८), सोनिया मेश्राम (१४), नीतेश पालवे (१२), आश्लेषा कडू (११), आशू वैद्य (११), देवयानी कारामोरे (१३), बाली गुरनुले (१३), वैष्णवी पालवे (१३), दयावंती उके, उज्ज्वला मनघाटे यांच्यासह अन्य आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे कळू शकली नाहीत.
नगरधन, नेरला, चाचेर, तारसा यासह परिसरातील गावांमधील विद्यार्थी रामटेक येथे शिकायला येत असून, ते रोज बसने ये जा करतात. ही सर्व गावे रामटेक - मौदा मार्गावर असून, या मार्गावर बसेसची संख्या कमी आहे. शिवाय, रामटेक आगाराच्या बहुतांश बसेस वेळेवर सोडल्या जात नाही. शाळा सुटल्यानंतर ही सर्व मुले बसची प्रतीक्षा करीत बसस्थानकात बसली होती. तासभरानंतरही बस न लागल्याने आगार व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांच्या सोईसाठी एमएच-०७/सी-७५१८ क्रमांकाची ज्यादा बस रामटेक - मौदा मार्गावरील नेरल्यापर्यंत पाठविण्याची व्यवस्था केली. संजय चहांदे हा त्या बसचा चालक तर नितीन माकडे हा वाहक होता.
या बसमध्ये ५० च्या आसपास विद्यार्थी व काही प्रवासी होते. ही बस सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मौदा टी पॉर्इंटपासून पुढच्या प्रवासाला निघाली. काही अंतरावर जाताच चालकाचा ताबा सुटला आणि बस रोडच्या कडेला उलटली. त्यात २० विद्यार्थी जखमी झाले. बसचालक संजय चहांदे हा दारू प्यायला असल्याचे विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी सांगितले. अपघात होताच त्याने बस सोडून पळ काढला.
माहिती मिळताच पोलिसांसह शिक्षक व नागरिकांनी घटनास्थळ गाठून सर्व विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले आणि जखमींना लगेच रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. यात काही विद्यार्थ्यांचे हात व पाय फ्रॅक्चर झाले असून, काहींना मुका मार लागला. दुसरीकडे, रामटेक आगाराच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.

Web Title: At least 20 students were injured in a bus mishap in Ramtek area of ​​Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात