तुमचे लग्न असेल तरच मिळणार सुटी; रेल्वे पोलिसांना ताबडतोब कामावर परतण्याचे आदेश
By नरेश डोंगरे | Updated: October 31, 2023 22:40 IST2023-10-31T22:40:43+5:302023-10-31T22:40:52+5:30
मराठा आंदोलन, राज्यातील सर्व रेल्वेस्थानके, रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर

तुमचे लग्न असेल तरच मिळणार सुटी; रेल्वे पोलिसांना ताबडतोब कामावर परतण्याचे आदेश
नागपूर : तुमचे स्वत:चे लग्न असेल तरच तुम्हाला सुटी मिळेल. हे आणि आणखी एका कारणास्तव तुम्हाला सुटी मिळेल. बाकी सर्व प्रकारच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सुटीवर असाल तर ताबडतोब कर्तव्यावर पोहचा, असे कडक आदेश सोमवारी मध्यरात्री रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दला (आरपीएफ)च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. या सोबतच मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, डोळ्यात तेल घालून राज्यातील सर्व रेल्वे स्थानकाच्या आत-बाहेर अतिशय सतर्कतेने कर्तव्य बजावा, असेही आदेश जारी करण्यात आले आहे.
आरक्षणाच्या संबंधाने अद्याप तोडगा न निघाल्याने राज्यातील मराठा आंदोलन आता जागोजागी चिघळू लागले आहे. मराठा समाज आक्रमक झाल्यामुळे ठिकठिकाणी नेत्यांना घेराव, कार्यक्रमात घोषणाबाजी, बैठका उधळून लावणे, नेत्यांना गावबंदी, कार्यक्रम बंदी करण्यात आली असून काही नेत्यांच्या घरांची जाळपोळ, दगडफेक, टायर जाळणे, घोषणाबाजी रास्ता रोको आंदोलन सुरू झाले आहे. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडही सुरू आहे. आंदोलकांची नजर रेल्वेस्थानक, रेल्वेगाड्यांवरही जाऊ शकते. त्यामुळे भलतेच वळण मिळू शकते, असे संकेत मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांना अलर्ट देण्यात मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर, रेल्वे सुरक्षेशी संबंधित राज्यातील यंत्रणा सोमवारी अलर्ट मोडवर आली आहे.
सोमवारी मध्यरात्री मुंबई मुख्यालयातून राज्यातील सर्व रेल्वे पोलिसांना खबरदारीचे आदेश देण्यात आले. 'तुमच्या सर्व प्रकारच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तुमचे (नोकरीत असलेल्यांचे) स्वत:चे लग्न असेल किंवा तुम्ही आजारी असाल तरच तुमची सुटी मंजूर समजा. दुसऱ्या कोणत्याही कारणास्तव तुम्हाला सुटी मिळणार नाही. अगदी साप्ताहिक रजा (विकली ऑफ)सुद्धा रद्द करण्यात आल्या असून, तुम्ही यापूर्वी विविध कारणाने रजा मंजूर करून घेतली असेल तर ती रद्द झाल्याचे समजून ताबडतोब कर्तव्यावर परता', असे आदेश रेल्वेे पोलिसांना देण्यात आले आहे. दरम्यान, आज पहाटेपासून रेल्वेस्थानकाच्या आत-बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे.
'त्यांची' उडाली तारांबळ, अनेकांचा हिरमोड
सुट्या रद्द झाल्याच्या आदेशासोबतच सर्वांनी अत्यंत सतर्कपणे रेल्वे गाड्या, रेल्वे स्थानकाच्या आतबाहेर कर्तव्य बजावण्याचे आदेश सोमवारी मध्यरात्रीपासून जीआरपी आणि आरपीएफच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर फिरत असल्याने काही जणांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दिवाळी तोंडावर असल्याने काही जण दूरदूरवरच्या आपल्या गावात गेल्याने त्यांची कर्तव्यावर हजर राहण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
आधी लगिन कोंढाण्याचे !
आणिबाणीची स्थिती निर्माण झाल्यामुळे घरात मुलगा रायबाचे लग्नाचे शूभकार्य असूनही ते बाजुला सारत 'आधी लगीन कोंढाण्याचे' अशी घोषणा बहाद्दर योद्धे तानाजी मालुसरे यांनी केली होती. ते साल होते १६७० चे. आता राज्यात मराठ्यांचे मोठे आंदोलन सर्वत्र सुरू आहे. हे आंदोलन चिघळत असल्यामुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणेवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गढ अबाधित राखण्याचे आव्हान ठाकले आहे. त्याचमुळे पोलिसांच्या सर्व सुट्टया रद्द् करण्यात आल्या असून, तुमचे महत्वाचे काम बाजुला ठेवा, नंतर करा, आधी कर्तव्यावर या, असे आवाहन वजा आदेश सुरक्षा व्यवस्थेचा किल्ला लढविणाऱ्यांना पोलिसांना देण्यात आले आहे.