पेंच प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:48 AM2017-11-15T00:48:12+5:302017-11-15T00:48:33+5:30
पेंच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकºयांना रब्बी पिकांसाठी एक पाळी पाणी देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकºयांना रब्बी पिकांसाठी एक पाळी पाणी देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. रब्बी पिकांसाठी एक पाळी पाणी देण्यासाठी सुमारे १०० दशलक्ष घनमीटर पाण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
पेंचच्या जलाशयात अत्यल्प जलसाठा आहे. रब्बीच्या पिकांसाठी मुबलक पाणी सोडले तर पुढे पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण होईल, अशी परिस्थिती आहे. यामुळे शेतकºयांना रब्बी पिकासाठी पाणी मिळणार नाही, असे चित्र तयार झाले होते. यामुळे शेतकºयांची चिंता वाढली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा लावून धरत पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी केली होती. पेंच प्रकल्पाच्या लाभधारकांना रब्बी हंगामात एक पाळी पाणी सोडण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात असणाºया शेतकºयांसाठी पेंच धरणाचे बिगर सिंचन कामे आरक्षण वगळता उर्वरित पाण्यातून रब्बी पिकांसाठी पाणी देण्याबाबत सूचना दिली आहे. त्यानुसार अंदाजे १०० दशलक्ष घनमीटर पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले आहेत.
रब्बी पिकांसाठी पाणी देण्यासंदर्भात आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार आशिष जैस्वाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर तसेच लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांनी पाठपुरावा केला होता. पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा व पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच नागपूर महापालिकेने काटकसरीने वापर करून पाणी बचतीचा संदेश जनतेपर्यंत पोहचवावा, असे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले आहे.