शेताच्या कुंपणावर विद्युत तारा सोडणे जीवावर बेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:28+5:302021-09-16T04:12:28+5:30
काटोल : जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेताच्या कुंपणावर सोडलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एका तरुणाचा नाहक जीव गेला. काटोल ...
काटोल : जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेताच्या कुंपणावर सोडलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एका तरुणाचा नाहक जीव गेला. काटोल तालुक्यातील भोरगड शिवारात बुधवारी ही घटना घटली. सागर रामचंद्र कौरती (२०) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे सागर सकाळी शेतात फेरफटका मारायला गेला होता. मात्र रात्रीच्या वेळी जंगली प्राणी शेतात येऊ नये म्हणून सुरू केलेले कुंपणावरील विद्युत तारेचा प्रवाह बंद करण्यात आला नसल्याने त्याचा तारांना स्पर्श झाला. त्यातच त्याचा करंट लागून मृत्यू झाला. काही वेळानंतर सागरचे आजोबा गेले असता त्यांना सागराला करंट लागल्याचे दिसून आले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने सागरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती काटोल पोलिसांना देण्यात आले. यात शेतात करंट लावल्या प्रकरणी शेतमालक म्हणजे सागरच्या आजोबावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती आहे. घटनेचा तपास काटोल ठाणेदार आचरेकर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
---
पीक वाचवायची कशी?
शेतात जंगली श्वापदे येऊन पिकांची नासाडी करतात. याच भीतीने शेतकऱ्यांनी शेताला कुंपण टाकले आहेत. परंतु काही जंगली जनावरे या कुंपणाला न जुमानता पीक नष्ट करतात. यावर उपाय म्हणून शेतकरी कुंपणावर जिवंत विद्युत तार सोडून बंदोबस्त लावण्याचा अनेकदा प्रयत्न करतात. यात एका तरुणाचा करून अंत झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं करावं तरी काय असा प्रश्न भागातील शेतकरी विचारत आहे .