छत्रपती चौकातील एलईडी साईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:08 AM2021-02-27T04:08:14+5:302021-02-27T04:08:14+5:30
- महामेट्रोचा महसूल वाढीचा प्रयत्न : वाहनचालकांचे लक्ष होतेय विचलित राहुल लखपती नागपूर : महसूल वाढीसाठी महामेट्रोने छत्रपती चौकात ...
- महामेट्रोचा महसूल वाढीचा प्रयत्न : वाहनचालकांचे लक्ष होतेय विचलित
राहुल लखपती
नागपूर : महसूल वाढीसाठी महामेट्रोने छत्रपती चौकात लावलेल्या एलईडी साईन बोर्डमुळे अपघात होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहरातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणारे आणि स्मार्ट सिटी मिशनमधील मुख्य घटकांपैकी एक असलेल्या महा मेट्रोने ‘नॉन-बॉक्स भाडे महसूल’ (प्रवासी नसलेला महसूल) वाढविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. महामेट्रोला प्रवाशांच्या माध्यमातून पुरेसा महसूल अजूनही मिळत नाही. महसूल मिळविण्यासाठी महामेट्रोने छत्रपती चौकात एक एलईडी वॉल (डिजिटल अॅडव्हर्टायजमेंट माध्यम) बसविले असून महामेट्रोच्या वेळेची माहिती तसेच जनतेसाठी वेळोवेळी सर्वसाधारण व वैधानिक माहिती प्रसारित करण्यात येते. चौकात लावलेला एलईडी साईन बोर्ड फारच मोठा असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा आहे. या चौकात अनेक अपघात होत असल्याने जुना छत्रपती चौक उड्डाणपूल केवळ त्या उद्देशाने बांधण्यात आला होता. जुना उड्डाणपूल भारताच्या पहिल्या बहुस्तरीय वाहतूक व्यवस्थेसाठी मार्ग काढण्यासाठी पाडण्यात आला.
या संदर्भात माहिती घेण्यासाठी लोकमतने मनपाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, उड्डाणपूल व रस्ता महामेट्रो अंतर्गत आहे. त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. या ठिकाणी महामेट्रोने एलईडी वॉल बसविल्याची माहिती आहे. स्क्रिनचा समोरील भाग मनपाच्या कोणत्याही रस्त्यासमोर येत असेल तर मनपाला न्यायालयाने निश्चित केल्यानुसार परवाना शुल्क भरावे लागेल.
एलईडी होर्डिंग संदर्भात महामेट्रोचे अधिकारी म्हणाले, नियमांचे पालन करून चौकात लावण्यात आलेले डिजिटल होर्डिंग अनिवार्य उंचीवर लावले आहे. त्यामुळे वाहनचालकाचे लक्ष विचलित होत नाही. कायदा असा म्हणतो की, सार्वजनिक रस्त्यावर कोणतीही जाहिरात २.४ मीटर उंच असली पाहिजे. महामेट्रोने नॉन प्रवासी महसूल मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. महसूल प्राप्त करण्यासाठी हा एक मार्ग आहे. सध्या एलईडी वॉलवर कोणत्याही जाहिराती चालवल्या जात नाहीत, परंतु भविष्यात आम्ही व्यावसायिक जाहिराती घेणार आहोत.
खासदार रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य चंद्रशेखर मोहिते म्हणाले, महामेट्रोने छत्रपती चौकात डिजिटल होर्डिंग लावल्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होऊ शकतात. तांत्रिकदृष्ट्या ते योग्य असेल, परंतु स्क्रिन नक्कीच लक्ष वेधून घेईल आणि लोकांची एकाग्रता कमी होण्याची शक्यता आहे. वापरलेली एलईडी खूपच चमकदार असून ती मंद असायला हवी. त्यामुळे वाहनचालकाला स्क्रिन पाहण्यास भाग पाडणार नाही. शहराच्या सुशोभिकरणासाठी हे चांगले आहे, परंतु यामुळे मानवी जीव किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ नये.