नागपुरात ‘एलईडी’ पथदिव्यांचा कधी पडणार उजेड ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 10:06 AM2018-04-05T10:06:47+5:302018-04-05T10:06:55+5:30
मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मार्च २०१८ पर्यत २३ हजार एलईडी दिवे लावण्यात आले. त्यामुळे १ लाख २५ हजार एलईडी पथदिव्यांची शहरातील नागरिकांना आणखी काही वर्षे प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
गणेश हूड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याचा विचार करता महापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात १८ महिन्यात २७ हजारांचे उद्दिष्ट असताना जेमतेम ५३७ पथदिवे बदलविले. त्यामुळे जे.के. सोल्युशन इंक कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात नव्याने या कामाला सुरुवात करण्यात आली. मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मार्च २०१८ पर्यत २३ हजार एलईडी दिवे लावण्यात आले. त्यामुळे १ लाख २५ हजार एलईडी पथदिव्यांची शहरातील नागरिकांना आणखी काही वर्षे प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
महापालिकेला दरवर्षी पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती तसेच वीज बिलावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. या खर्चासोबतच ऊर्जा बचत व्हावी, या हेतूने सोडियम दिव्याऐवजी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. या प्रकल्पांवर ४७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात नादुरुस्त केबल बदलणे, तुटलेल्या खांबाच्या ठिकाणी नवीन खांब बसविणे, फिडबॅक देणारे नवीन फिडर बसविणे आदी कामांचा समावेश आहे. यावर ५९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र आर्थिक टंचाईमुळे प्रकल्पाचे काम संथ आहे. पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या भागात एलईडी दिवे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर शहरातील रस्त्यांवरील विद्यमान पथदिवे बदलवून त्याठिकाणी एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांत प्रकल्पावरील खर्च निघून ३५० कोटींची बचत होईल असा दावा पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
झोन निहाय कंत्राट तरीही विलंब
२०१४ मध्ये जे.के. सोल्युशन इंक कंपनीला निर्धारित कालावधीत एलईडी दिवे बसविण्यात अपयश आल्याने या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. या कंपनीचा अनुभव विचारात घेता झोननिहाय एलईडी दिवे बसविण्याचे वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले.
२६ हजार एलईडी आले, २३ हजार लागले
शहराच्या विविध भागात लावण्यासाठी २६ हजार एलईडी प्राप्त झाले आहे. यातील २३ हजार लावण्यात आले. ३ हजार एलईडी लावण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. पथदिवे लावण्याच्या कामाची गती वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एस.बी. जयस्वाल, कार्यकारी अभियंता विद्युत
फायद्याचा प्रकल्प असूनही विलंब
या प्रकल्पामुळे पथदिव्यांची जागा एलईडी दिवे घेणार असल्याने देखभाल व दुरुस्तीच्या खर्चाच्या खर्चात मोठी कपात अपेक्षित आहे. तसेच ६० ते ७० टक्के ऊर्जा बचत होणार असल्याने ९९ महिन्यात एलईडी दिवे लावल्यानंतर पुढील ९ वर्षात प्रकल्पावरील संपूर्ण खर्चाची परतफेड होऊन ३५० कोटींची बचत होणार आहे. असे असूनही प्रकल्पाला विलंब का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.