हॉटेल, लग्नकार्यातून शिल्लक अन्न जाते कचऱ्यात; भुकेलेल्यांपर्यंत पोहचणाऱ्या हातांची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 08:46 PM2022-10-22T20:46:06+5:302022-10-22T20:46:38+5:30
Nagpur News मंगल कार्यालय किंवा काही हॉटेलमध्ये होणारी अन्नाची नासाडी काळजी वाढविणारी आहे. या उरलेल्या अन्नातून अनेकांचे भूक भागविण्यासाठी काम करणाऱ्या संस्था शहरात नगण्यच आहे.
नागपूर : भुकेल्यांच्या इंडेक्समध्ये देशाचे स्थान चिंताजनक असताना मंगल कार्यालय किंवा काही हॉटेलमध्ये होणारी अन्नाची नासाडी काळजी वाढविणारी आहे. या उरलेल्या अन्नातून अनेकांचे भूक भागविण्यासाठी काम करणाऱ्या संस्था शहरात नगण्यच आहे. शहरातील हॉटेलमध्ये उरलेले अन्न महापालिकेच्या कचरा गाडीतच जाते.
- शहरात ५ हजारांवर हॉटेल
शहरात छोटे-मोठे असे ५००० वर हॉटेल आहे. मोठ्या हॉटेलची संख्या जवळपास ५०० आहे. मोठ्या हॉटेलमध्ये ग्राहकांच्या संख्येनुसार नियोजन केले जाते किंवा ऑर्डरनुसार अन्न बनविले जाते. त्यामुळे फार कमी अन्न उरते. तेही नियमित अन्न उरत नाही. उरलेले अन्न घेऊन जाणाऱ्या संस्था फार नसल्यामुळे महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीतच अन्न टाकावे लागते. छोट्या हॉटेल चालकांचा व्यवसायही लिमिटेड असतो. ग्राहकांच्या मागणीनुसार अन्न शिजविले जाते. त्यामुळे फार अन्न उरत नसल्याचे हॉटेल व्यावसायिक कुणाल नितनवरे यांनी सांगितले.
- ५०० मंगल कार्यालये
सर्वात जास्त अन्नाची नासाडी ही लग्न कार्यात किंवा तेरवी, चौदावीच्या कार्यक्रमात अथवा महाप्रसादासारख्या मोठमोठ्या आयोजनात होते. शहरात हॉटेल व लॉन मिळून ५०० च्या जवळपास मंगल कार्यालये आहेत. मंगल कार्यालयाचा व्यवसाय हा सीझनेबल आहे. लग्नसोहळ्याच्या सीझनमध्ये अन्न उतरते. पण कॅटरिंगवाले हे अन्न घेऊन जात असल्याचे डांगे सेलिब्रेशन लॉनचे संचालक शिशुपाल डांगे यांनी सांगितले. आम्हाला लग्नकार्यात मिळालेल्या ऑर्डरनुसार आम्ही अन्न शिजवितो. आमचा हिशेब प्लेटनुसार असतो. अशात काही प्लेट अन्न उरले तर ज्यांच्याघरचे लग्न असेल त्यांना देतो. त्यांनी उरलेले अन्न नाही घेतल्यास आम्ही ताजबाग व जिथे भिकारी जास्त असतात. तिथे वाटप करीत असल्याचे नेरकर कॅटरर्सचे संचालक शरद नेरकर यांनी सांगितले.
- उरलेले अन्न भुकेल्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी
आमचे शहरात विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ३०० व्हॉलेंटियर्स आहेत. आम्ही शहरातील काही हॉटेल्ससोबत व मंगल कार्यालयांच्या संपर्कात आहोत. त्यांच्याकडून आम्हाला कॉल आला की आम्ही उरलेले अन्न गोळा करतो. ते अन्न आम्ही अनाथालय व स्लम वस्तीमध्ये वितरीत करतो. कॅटरिंग व्यावसायिकांकडून आम्हाला जास्त कॉल येतात. शहरातील हॉटेल व लग्नसोहळे लक्षात घेता त्यात उरलेले अन्न कलेक्ट करणाऱ्या संस्था फार कमी आहेत. त्या वाढणे गरजेचे आहे.
निश्चय शेंडे, समन्वयक, रॉबिनहूड आर्मी