बेफिकिर झुरकेबाजांना रेल्वेचा दणका: कायदेशिर कारवाई अन् दंडही वसूल
By नरेश डोंगरे | Published: February 20, 2024 08:23 PM2024-02-20T20:23:44+5:302024-02-20T20:24:07+5:30
धुम्रपान करणे अंगलट
नागपूर : रेल्वे स्थानक, परिसर, फलाटं असे कुठेही उभे राहून, कुणाचीही पर्वा न करता सिगारेटचे बिनधास्त झुरके लावणाऱ्या झुरकेबाजांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. रेल्वे अधिनियमानुसार त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून दंडही वसुल करण्यात आला आहे.
धुम्रपान करणाऱ्यापेक्षा जास्त विपरीत परिणाम धुम्रपान न करणाऱ्यांवर होतात. हे माहिती असूनही धुम्रपानाचा शाैक असलेली मंडळी कशाहीची पर्वा न करता आपली तलफ भाविण्यासाठी कुठेही बिनधास्तपणे सुरू होतात. आजुबाजुला असलेले पुरूष, महिला, वृद्ध, मुले अशांना सिगारेच्या धुराचा, वासाचा त्रास होत असताना देखिल त्याची तमा न बाळगता ही मंडळी कुठेही विडी-सिगारेट सुलगवून झुरके लगावतात. त्यांच्या नाकातोंडातून निघणाऱ्या धुराचा अनेकांना त्रास होतो.
त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशिर कारवाईची तरतुदही करण्यात आली आहे. कारवाईचा ईशारा देणारे फलकं जागोजागी दिसत असूनदेखिल धुम्रपान करणारे त्याला जुमानत नाहीत. पान, खर्रा खाऊन कुठेही पिचकारी मारणारे आणि विडी, सिगारेट सुलगावून झुरके लगावणारे ठिकठिकाणी दिसतात.
रेल्वे प्रशासनाने जानेवारी महिन्यात अशांवर नजर ठेवून कारवाई करण्याची सूचना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना केली होती. त्यानुसार, गेल्या महिन्यात रेल्वे स्थानक आणि परिसरात सिगारेटचे झुरके लावणारे २० जण पकडण्यात आले. त्यांच्यावर रेल्वे काययद्यानुसार गुन्हा दाखल करून रेल्वे प्रशासनाने प्रत्येकावर २०० रुपये दंडाची कारवाई केली.
महिनाभरात ८८२ जणांवर कारवाई
अशाच प्रकारे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे नियमांचे उल्लंघन करणारे एकूण ८८२ व्यक्ती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून दंडाखातर १४ हजार, ८०० रुपये वसूल करण्यात आले. सुरक्षिततेची मानके राखण्यासाठी आणि रेल्वेच्या परिसरात वातावरण चांगले ठेवण्यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, अन्यथा यापुढे कडक कारवाई करण्यात येईल, असा ईशाराही या कारवाईनंतर रेल्वे प्रशासनाने दिला आहे.