होळीसाठी झाडे तोडाल तर कायदेशीर कारवाई : मनपाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 08:33 PM2019-03-19T20:33:19+5:302019-03-19T20:34:45+5:30
महापालिकेची परवानगी न घेताच होळीसाठी झाडे तोडाल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. कायद्यानुसार बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडही होऊ शकतो. बेकायदा वृक्षतोड आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर महापालिकेने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची परवानगी न घेताच होळीसाठी झाडे तोडाल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. कायद्यानुसार बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडही होऊ शकतो. बेकायदा वृक्षतोड आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर महापालिकेने दिला आहे.
होळीसाठी सार्वजनिक रस्त्याच्या आजूबाजूची तसेच खासगी गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील झाडे जाळण्यासाठी तोडली जाण्याची शक्यता असते. यामुळे झाडांची संख्या कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहचते. या बाबींना प्रतिबंध करण्यासाठी पालिकेच्या उद्यान खात्यातील संबंधित अधिकारी व कर्मचायांना सतर्क राहण्याचे तसेच अवैध वृक्षतोडीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५च्या कलम २१ मधील तरतुदींनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे किंवा तोडण्यासाठी कारणीभूत होणे हा अपराध असून या अपराधाकरिता कायद्यात शिक्षेची तरतूद आहे.
होळीच्या दिवसात वृक्षतोड होऊ नये, यासाठी उद्यान विभागाचे उपउद्यान अधीक्षक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी, उद्यान विद्या सहायक यांना ठिकठिकाणी लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली आहे.
नागपूर शहरात मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरू आहेत. यात मेट्रो रेल्वे, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास यासह अनेक सरकारी प्रकल्पांसाठी शेकडो झाडांचा बळी घेतला जातो. झाडांची संख्या कमी होत असताना दरवर्षी होळीसाठी झाडांची अवैध कत्तल होण्याची शक्यता असते. याचा पर्यावरणावर परिणाम होतो. त्यामुळे होळीसाठी झाडे तोडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. पर्यावरण संदर्भात मागील काही वर्षात जागृती आलेली आहे. परंतु अजूनही काही लोकांची अवैधरीत्या झाडे तोडण्याची मानसिकता आहे. अशा लोकांना कायद्याचा धाक आवश्यक असतो.
टायरमुळे प्रदूषण
नागपूर शहरात आता दिवसेंदिवस होळीची संख्या वाढत आहे. गेल्यावर्षी ही संख्या ९२० इतकी होती. वाईट प्रवृत्तीचे दहन म्हणून होळी पेटवली जाते. यात लाकडे तर पेटवली जातात परंतु काही लोक वाहनांचे टायर, कचरा व प्लास्टिक होळीत जाळतात यामुळे प्रदूषण होते. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. असे प्रकार टाळण्याची गरज आहे.