विधी पत्रकारितेत परिश्रम आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:20 AM2018-08-31T00:20:27+5:302018-08-31T00:22:24+5:30
अतिशय कठीण क्षेत्र असलेल्या विधी पत्रकारितेमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रम आवश्यक आहे, असे मत विधी पत्रकारितेतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व अजित गोगटे यांनी गुरुवारी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिशय कठीण क्षेत्र असलेल्या विधी पत्रकारितेमध्ये यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रम आवश्यक आहे, असे मत विधी पत्रकारितेतील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व अजित गोगटे यांनी गुरुवारी प्रेस क्लब येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यक्त केले. ते ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक असून सध्या मुंबई येथे कार्यरत आहेत.
विधी पत्रकारिता करण्यासाठी कायद्याची पदवी घेणे आवश्यक नाही. परंतु, हा थातूरमातूर करण्याचा विषयही नाही. त्यामध्ये सातत्य ठेवणे व प्राविण्य प्राप्त करणे गरजेचे आहे. आपल्याकडे दुर्दैवाने महाविद्यालयस्तरावर विधी पत्रकारितेचे धडे दिले जात नाही. त्यामुळे या क्षेत्रात थेट विहिरीत उडी घेऊन पोहणे शिकण्याची परिस्थिती आहे. हा विषय झटपट समजत नाही. त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. विधी पत्रकारितेचा विषय आल्यास आजही बहुतेकजण हात वर करतात. आपल्याला यातील काहीच कळत नाही असे सांगून वेगळे होतात. त्यात बऱ्याचअंशी तथ्य आहे. असे आधीही होत होते. त्यामुळे वकिलांकडून बातम्या मागवल्या जात होत्या. परंतु, वकील हा वकीलच असतो. तो विद्वान असला म्हणजे चांगला पत्रकार होऊ शकतो असे म्हणता येत नाही. वाचकांना सोप्या व रंजक भाषेमध्ये बातम्या द्याव्या लागतात. हे कौशल्य केवळ चांगल्या पत्रकारांमध्येच असते असे गोगटे यांनी सांगितले.
न्यायालयीन बातम्यांमध्ये अचूकता महत्त्वाची आहे. त्यात इकडे-तिकडे केल्यास न्यायालय अवमाननाची कारवाई होण्याची भीती असते. त्यामुळे प्रकरणाची सुनावणी सुरू असताना विधी पत्रकाराने न्यायालयात स्वत: हजर राहिले पाहिजे. बातमीसाठी वकिलांवर विसंबून राहणे बरेचदा घातक ठरते. वकील स्वत:च्या फायद्याची माहिती देत असतो. त्यातून परिपूर्ण बातमी करता येत नाही. न्यायालयांमध्ये नियमित घडामोडींशिवाय इतरही अनेक बातम्या असतात. त्या बातम्या मिळविण्यासाठी न्यायालयात फिरणे व न्यायालयात कार्यरत व्यक्तींचा विश्वास संपादित करणे आवश्यक असते. प्रत्येक नागरिकांना कायद्याचे ज्ञान रहात नाही. त्यामुळे नागरिकांना कायदेविषयक तरतुदींविषयी जागृत करणे ही सुद्धा विधी पत्रकारांची जबाबदारी असते. न्यायालयांचे निर्णय सखोल वाचणे व योग्य अर्थ समजून बातमी तयार करणे यात विधी पत्रकारांचा कस लागत असतो. बातमीचा हा प्रकार अनुभवातून शिकण्याची बाब आहे असेही गोगटे यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी विधी पत्रकारितेतील स्वत:च्या विविध अनुभवांची माहिती दिली.