'कॉलरवाली' वाघिणीच्या हृदयात दडली होती ‘माय’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 11:06 AM2022-01-18T11:06:30+5:302022-01-18T11:12:38+5:30
या वाघिणीने उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना केवळ आनंदच दिला नाही, तर एका दशकाहून अधिक काळ मध्य भारतातील वाघांच्या संख्येतही मोठे योगदान दिले.
संजय रानडे
नागपूर : लगतच्या मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील कॉलरवाली वाघिणीच्यामृत्यूने वन्यजीवांच्या इतिहासातील एक अध्याय संपला असला तरी ही ‘सुपरमॉम’ आज अस्तित्वात नाही यावर अद्यापही विश्वास बसत नाही. हिंस्र श्वापद असलेल्या या वाघिणीच्या हृदयातही एक ‘माय’ दडली होती. त्याचा प्रत्यय आलेल्या अनेकांना आता तिच्या आठवणी अस्वस्थ करीत आहेत.
कॉलरवाली वाघिणीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’जवळ तिच्या आठवणी काढताना पीटीआरचे माजी क्षेत्र संचालक विक्रम सिंह परिहार म्हणाले, २१ मे २०१८ ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत पीटीआरचे क्षेत्र संचालक म्हणून काम करताना तिला जवळून पाहण्याची संधी मिळाली. ती एक अतिशय धाडसी, बछड्यांची काळजी घेणारी वाघीण होती. कर्मचाऱ्यांच्या जवळून जातानादेखील ती कधीच आक्रमकता दाखवत नसे.
२९ बछड्यांची आई
या वाघिणीने उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना केवळ आनंदच दिला नाही, तर एका दशकाहून अधिक काळ मध्य भारतातील वाघांच्या संख्येतही मोठे योगदान दिले. या वाघिणीने आठ वेळा एकूण २९ बछड्यांना जन्म दिला, त्यापैकी २५ पिल्लांचे यशस्वीपणे पालनपोषण केले.
एक अविस्मरणीय अनुभव
कॉलरवाली वाघिणीसंदर्भात २०२० मधील एक अविस्मरणीय अनुभव विक्रम सिंह परिहार यांनी सांगितला. १६ सप्टेंबरला आपल्या गस्तीदरम्यान, त्यांना ही वाघीण करमाझिरीतील मलकुंडम नाल्याजवळील जंगलाच्या रस्त्यावर तिच्या अर्धप्रौढ झालेल्या बछड्यासोबत बसलेली होती. २७ डिसेंबर २०१८ रोजी जन्म झालेला तो नर बछडा २३ महिन्यांचा होता. या पिल्लाला ती खोटे खोटे रागावून हाकलून देण्याचा प्रयत्न करीत होती. या नर बछड्याने दूर जाऊन आपला स्वतंत्र अधिवास तयार करावा आणि त्या क्षेत्रात प्रवेशलेल्या दुसऱ्या प्रौढ नर वाघापासून (त्याच्या वडिलांपासृून) त्याचा बचाव करणे हा यामागील तिचा उद्देश होता. आपल्या बछड्यांना सांभाळण्याची तिची ही पद्धत विलक्षणच म्हणावी!
व्याघ्र संवर्धनात अविस्मरणीय योगदान - भावनिक परिहार
भारतीय वन सेवेतून अलीकडेच निवृत्त झालेले भावनिक परिहार म्हणाले, कॉलरवाली वाघिणीने आठ वेळा २९ बछड्यांना जन्म दिला. २० पेक्षा अधिक बछड्यांचे संगोपन केले. हे तिचे व्याघ्र संवर्धनातील योगदान अविस्मरणीयच म्हटले पाहिजे.