रणभूमीतील दिग्गज; भोसल्यांची रामटेकच्या गडावर चढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:50 PM2019-03-13T13:50:30+5:302019-03-13T13:50:55+5:30
रामटेकच्या रणभूमीत भोसले घराण्याला मतदारांनी डोक्यावर घेतल्याचा इतिहास आहे. १० व्या आणि १२ व्या लोकसभेत भोसले घराण्याला काँग्रेसच्या माध्यमातून संसदेत प्रतिनिधित्व मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: रामटेकच्या रणभूमीत भोसले घराण्याला मतदारांनी डोक्यावर घेतल्याचा इतिहास आहे. १० व्या आणि १२ व्या लोकसभेत भोसले घराण्याला काँग्रेसच्या माध्यमातून संसदेत प्रतिनिधित्व मिळाले. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी रामटेक लोकसभा मतदार संघ सोडल्यानंतर काँग्रेसने तेजसिंहराव भोसले यांना रामटेकच्या रणभूमीत उतरविले. त्यांची टक्कर भाजपचे पांडुरंग हजारे आणि जनता दलाचे चंद्रशेखर वानखेडे आणि बसपाचे मा. म. देशमुख यांच्यासोबत होती. काँग्रेसला देशात धक्के बसत असताना तेजसिंहराव भोसले यांनी १ लाख ३७ हजार ९५४ मतांनी विजय मिळवीत रामटेकच्या गडावर चढाई केली. तेजसिंहराव भोसले यांना २ लाख ४० हजार ४३७ मतदारांनी पसंती दर्शविली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे पांडुरंग हजारे यांना १ लाख २ हजार ४८३ मते मिळाली. जनता दलाचे चंद्रशेखर वानखेडे हे ५३ हजार ५३७ मतावरच थांबले. बसपाचे मा. म. देशमुख यांना १२ हजार ३९३ मतांवर समाधान मानावे लागले. देशात चंद्रशेखर यांचे सरकार पडल्यानंतर २१ जून १९९१ ला पी. व्ही. नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले. त्यामुळे राजकीयदृष्ट्या रामटेकची देशात वेगळी ओळख निर्माण झाली. या निवडणुकीत एकूण मतदानाच्या ५५.६३ टक्के मते तेजसिंहराव भोसले यांना मिळाली. यानंतर १९९६ मध्ये अकरावी लोकसभा अस्तित्वात आली. त्यावेळी काँग्रेसचे दत्ता मेघे यांनी रामटेकचे प्रतिनिधित्व केले. १९९८ मध्ये बाराव्या लोकसभेसाठी काँग्रेसने पुन्हा एका भोसले घराण्यावर विश्वास टाकला. राणी चित्रलेखा भोसले ६७ हजार ३८ मतांचे मताधिक्य घेत संसदेत पोहोचल्या. दुसऱ्यांदा भोसल्यांनी पुन्हा रामटेकचा गड सर केला. यावेळी सेनापती राणी चित्रलेखा होत्या. चित्रलेखा भोेसले यांच्याविरोधात शिवसेनेचे अशोक गुजर आणि बसपाचे माजी खा. राम हेडाऊ मैदानात होते. सेनेच्या वाघाने राणींना गड सर करताना या निवडणुकीत घाम फोडला.
राणी चित्रलेखा भोसले यांना ३ लाख २५ हजार ८८५ मते मिळाली तर अशोक गुजर यांना २ लाख ५८ हजार ८४७ मते मिळाली. राम हेडाऊ या निवडणुकीत फारसा चमत्कार करू शकले नाही. त्यांना केवळ ३० हजार ९४९ मतावरच थांबावे लागले. रामटेक लोकसभा क्षेत्रातील पहिल्या महिला खासदार होण्याचा मानही राणी चित्रलेखा भोसले यांना या निवडणुकीत मिळाला.