रणभूमीतील दिग्गज; रामटेकच्या रणभूमीत आतापर्यंत एकच महिला खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 02:04 PM2019-03-18T14:04:51+5:302019-03-18T14:05:21+5:30

रामटेक लोकसभा क्षेत्रातील सार्वत्रिक निवडणुकीत आतापर्यंत एकूण १४ महिलांनी नशीब आजमावले. परंतु त्यापैकी एकाच महिलेला विजयाची संधी मिळाली.

Legends of political battle ; One woman MP from Ramtek has so far | रणभूमीतील दिग्गज; रामटेकच्या रणभूमीत आतापर्यंत एकच महिला खासदार

रणभूमीतील दिग्गज; रामटेकच्या रणभूमीत आतापर्यंत एकच महिला खासदार

googlenewsNext
ठळक मुद्देराणी लढली अन् जिंकलीही!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक लोकसभा क्षेत्रातील सार्वत्रिक निवडणुकीत आतापर्यंत एकूण १४ महिलांनी नशीब आजमावले. परंतु त्यापैकी एकाच महिलेला विजयाची संधी मिळाली. त्यातही ही संधी मिळाली ती ११ व्या सार्वत्रिक निवडणुकीत राणी चित्रलेखा भोसले यांच्या रूपाने. रामटेकच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा मान हा त्यांना जातो. विशेष म्हणजे, त्यानंतर या मतदारसंघातून महिलेचा विजय झालेला नाही.
रामटेक लोकसभा क्षेत्र स्वतंत्रपणे अस्तित्वात आल्यानंतर या मतदार संघातील मतदारांनी आतापर्यंत १५ सार्वत्रिक आणि दोन पोटनिवडणुकीचा अनुभव घेतला. १९५७ मध्ये या मतदारसंघात काँग्रेसचे कृष्णराव देशमुख विजयी झाले. देशमुख यांना १ लाख ६६ हजार १२३ मते मिळाली तर त्यांच्या विरोधातील अपक्ष उमेदवार कृष्णराव यावलकर यांनी १ लाख २ हजार ४५० मते घेतली. यानंतर १९६२, १९६७, १९७१ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली.
पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर तब्बल २० वर्षांनी या मतदारसंघातून अलका पांडे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या. त्यांनी १८६४ मते घेतली. त्या निवडणुकीत काँग्रेसचे जतिराम बर्वे (१,९६,९७७ मते) हे विजयी झाले. १९८९ मध्ये लोकदलर्फे लता क्षत्रीय यांनी निवडणूक लढविली. मात्र काँग्रसेच्या पी. व्ही. नरसिंहराव (२,५७,८०० मते) यांच्यासारखा दिग्गज समोर असल्याने त्यांना केवळ ६७७ मते मिळाली. १९९९ मध्ये काँग्रेसच्या तेजसिंगराव भोसले यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या देवकीबाई नगरकर यांना १,६१४ मते प्राप्त झाली. १९९६ मध्ये पहिल्यांदा एकापेक्षा अधिक महिला निवडणूक रिंगणात उतरल्या.
कमलताई घटे आणि लता फुलझेले यांनी अनुक्रमे ९८९ व ९६४ मते घेतली. काँग्रेसचे दत्ता मेघे (२,०७,१८८) हे त्या निवडणुकीत विजयी झाले.
१९९८ मध्ये दिग्गज रिंगणात असताना काँग्रेसच्या राणी चित्रलेखा भोसले यांना रामटेकच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा मान मिळाला. शिवसेनेकडून अशोक गुजर तर बहुजन समाज पक्षाकडून राम हेडाऊ हे विरोधक निवडणुकीला उभे होते. ६७,०३८ मतांनी भोसले यांनी गुजर यांचा पराभव केला होता. यानंतर १९९९ मध्ये राजश्री देवी यांनी गोंडवाना गणतंत्र पक्षाकडून तर २००४ मध्ये नयना धवड-पांडे यांनी नशीब आजमावले. परंतु, त्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या सुबोध मोहिते यांचा विजय झाला. २००९ मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या रामटेक लोकसभा क्षेत्रातून बहुजन रिपब्लिकन एकता मंचकडून सुलेखा कुंभारे, समाजवादी पक्षातर्फे माया चवरे आणि डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टीतर्फे सीमा रामटेके यांनी निवडणूक लढविली. मात्र २००९ मध्येही महिलेला विजयाची संधी मिळाली नाही. निवडणुकीत काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांचा विजय झाला. यानंतर २०१४ च्या निवडणुकीत येथे तीन महिलांनी नशीब अजमाविले. यात बसपाच्या किरण पाटणकर यांना ९५ हजार ०५१ मतावर समाधान मानावे लागले.

Web Title: Legends of political battle ; One woman MP from Ramtek has so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.