रणभूमीतील दिग्गज; रामटेकच्या रणभूमीत दिग्गजांचे पानिपत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:58 AM2019-03-19T11:58:34+5:302019-03-19T11:59:03+5:30

रामटेक लोकसभा क्षेत्राचे निकाल सुरुवातीपासूनच धक्कादायक राहिले आहेत. रामटेकच्या मतदारांनी भाई बर्धन, बनवारीलाल पुरोहित, श्रीकांत जिचकार यासारख्या दिग्गजांना नापसंती दर्शविली आहे.

Legends of political battle; Ramtek refused legends | रणभूमीतील दिग्गज; रामटेकच्या रणभूमीत दिग्गजांचे पानिपत!

रणभूमीतील दिग्गज; रामटेकच्या रणभूमीत दिग्गजांचे पानिपत!

Next
ठळक मुद्देबर्धन, पुरोहित, देशमुख, जिचकार यांना मतदारांनी नाकारले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक लोकसभा क्षेत्राचे निकाल सुरुवातीपासूनच धक्कादायक राहिले आहेत. जतिराम बर्वे, अमृतराव सोनार, पी.व्ही.नरसिंहराव, दत्ता मेघे या सारख्या दिग्गजांना डोक्यावर घेणाऱ्या रामटेकच्या मतदारांनी भाई बर्धन, बनवारीलाल पुरोहित, श्रीकांत जिचकार यासारख्या दिग्गजांना नापसंती दर्शविली आहे. तेव्हाची राजकीय समीकरणे हेही या दिग्गजांच्या पराभवाचे प्रमुख कारण होते.
१९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून कृष्णराव देशमुख तर कृष्णराव यावलकर आणि बी. टी. भोसले हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. त्यात कृष्णराव देशमुख १ लाख ६६ हजार १२३ मते घेत ६३ हजार ६७३ मतांनी विजयी झाले. कृष्णराव यावलकर यांना १ लाख २ हजार ४५० मते पडली.
१९६२ मध्ये काँग्रेसतर्फे माधवराव पाटील, शेतकरी कामगार पक्षातर्फे बी.टी. भोसले आणि अपक्ष उमेदवार नारायण हरकरे यांनी निवडणूक लढविली. यात काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. १९६७ मध्ये काँग्रेसचे अमृत सोनार हे १ लाख ५ हजार ३४९ मतांनी विजयी झाले. त्यांच्याविरोधात रिपब्लिकनचे आर.एन. पाटील, जनसंघाचे एस.व्ही. शेलोकार आणि अपक्ष उमेदवार म्हणून आनंदराव कळमकर मैदानात होते. १९७१ मध्ये पुन्हा अमृत सोनार यांनी निवडणूक लढविली आणि विजयी झाले. त्यावेळी त्यांच्याविरोधात फॉरवर्ड ब्लॉकतर्फे आनंदराव कळमकर तसेच अपक्ष उमेदवार इंद्रराज हसराम, श्यामराव वंजारकर आणि कवडू उमरे हे होते. १९५७ ते १९७१ या कालावधीत झालेल्या निवडणुकीत बी.टी.भोसले, आनंदराव कळमकर यांनी दोनदा निवडणूक लढविली. मात्र त्यांना मतदारांनी नाकारले.
१९७४ मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा पोटनिवडणूक झाली. यात काँग्रेसला धक्का बसला. नाग विदर्भ समितीकडून राम हेडाऊ, भाकपतर्फे ए.बी. बर्धन आणि आनंदराव कळमकर यांनी निवडणूक लढविली. त्यातून पहिल्यांदा या मतदारसंघातून गैरकाँग्रेसी उमेदवाराचा विजय झाला. नाग विदर्भ समितीचे राम हेडाऊ यांनी २ लाख १९ हजार ८६० मते घेत आनंदराव कळमकर यांचा १ लाख ३१ हजार १२८ मतांनी पराभव केला. कळमकर यांना ८८ हजार ७३२ मते पडली. १९७७ ला तत्कालीन खासदार राम हेडाऊ यांनी पुन्हा निवडणूक लढविली. मात्र काँग्रेसच्या जतिराम बर्वे यांनी १ लाख ९६ हजार ९७७ मते घेत ४२ हजार ९४९ मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. १९८० मध्ये पुन्हा जतिराम बर्वे हे विजयी झाले. १९८४ मध्ये काँग्रेसच्या पी.व्ही.नरसिंहराव यांनी शंकरराव गेडाम यांचा पराभव केला. १९८९ मध्ये पी.व्ही.नरसिंहराव यांनी जनता दलाचे पांडुरंग हजारे, बसपाचे मा.म. देशमुख यांचा पराभव केला.
१९९१च्या निवडणुकीत भाजपकडून पांडुरंग हजारे यांनी निवडणूक लढविली. मात्र काँग्रेसच्या तेजसिंहराव भोसले यांनी १ लाख ३७ हजार ९५४ मतांनी त्यांचा पराभव केला. १९९६ मध्ये दिग्गज उमेदवारांनी या मतदारसंघातून नशीब आजमावले. त्यात काँग्रेसचे दत्ता मेघे, शिवसेनेचे प्रकाश जाधव, जनता दलाचे गोविंदराव वंजारी, अपक्ष कयमुद्दीन पठाण यांचा समावेश होता. यात काँग्रेसचे दत्ता मेघे हे विजयी झाले.
१९९८ मध्ये शिवसेनेच्या अशोक गुजर यांचा काँग्रेसच्या चित्रलेखा भोसले यांनी ६७ हजार ३८ मतांनी पराभव केला. सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला पहिल्यांदा धक्का बसला तो १९९९ मध्ये. शिवसेनेकडून सुबोध मोहिते, काँग्रेसकडून बनवारीलाल पुरोहित, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पांडुरंग हजारे, बसपतर्फे अशोक इंगळे आणि गोंडवाना गणतंत्र पक्षातर्फे राजश्री देवी हे निवडणूक रिंगणात होते. सुबोध मोहिते हे ११ हजार ६८९ मतांनी विजयी झाले. यानंतर २००४ मध्ये पुन्हा सुबोध मोहिते यांनी निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचा पराभव झाला. २००९ मध्ये मुकुल वासनिक (काँग्रेस), कृपाल तुमाने (शिवसेना), प्रकाश टेंभुर्णे (बसपा), सुलेखा कुंभारे (बरिएमं), माया चवरे (सपा) यांच्यासह अपक्ष उमेदवारांच्या भरमार होती. त्यात मुकुल वासनिक हे १६ हजार ७०१ मतांनी विजयी झाले.२०१४ मध्ये सेनेने तुमाने यांना पुन्हा संधी दिली. त्यांनी काँग्रेसचे मुकुल वासनिक यांचा पराभव केला.
दोन माजी मंत्र्यांना धक्का
२००७ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून प्रकाश जाधव तर काँग्रेसकडून माजी मंत्री सुबोध मोहिते, अपक्ष उमेदवार म्हणून माजी मंत्री रणजित देशमुख हे निवडणूक रिंगणात होते. त्यात प्रकाश जाधव यांनी दोन माजी मंत्र्यांचा पराभव केला. त्यांच्या विजयाने रामटेक लोकसभा क्षेत्रात शिवसेनेची हॅट्ट्रिक झाली.

Web Title: Legends of political battle; Ramtek refused legends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.