शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी कायदा करा!
By योगेश पांडे | Published: December 13, 2023 05:32 PM2023-12-13T17:32:14+5:302023-12-13T17:32:48+5:30
विधानपरिषदेत सदस्यांची मागणी : विविध जिल्हयांत भरारी पथके तयार करणार
नागपूर : विधानपरिषेत मंगळवारी ड्रग्जविक्रीच्या मुद्द्यावर मोठे खुलासे झाल्यानंतर बुधवारी शाळांच्या परिसरात होणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीच्या मुद्द्यावरून सदस्यांनी गंभीर मंथन केले. शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला चाप लावण्यासाठी शासनाने कडक कायदाच करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर राज्य शासनातर्फे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराबबाबा आत्राम यांनी यासंदर्भात पावले उचलण्यात येतील असे आश्वासन दिले.
विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यातील अनेक शाळांच्या १०० मीटरच्या आतदेखील पानटपऱ्या असून तेथे सर्व प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ, अनेकदा तर अंमली पदार्थांचीदेखील विक्री होते असा आरोप सदस्यांनी लावला. विक्रीला मनाई आदेश असला तरी त्याला हरताळ फासत सर्रासपणे असे प्रकार चालतात. यामुळे सरकारने कठोर कायदा तयार करावा अशी मागणी सदस्यांनी लावून धरली.
शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके निर्माण करण्यात येणार आहेत.
राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ मिळू नये म्हणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जरब बसविण्यासठी राज्यातील संबंधित यंत्रणा व पालकांची एक संयुक्त बैठक घेऊन कडक कायदा करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी ‘मकोका’ लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आत्राम यांनी स्पष्ट केले.