काँग्रेससाठी विधानसभेची वाट कठीण
By admin | Published: March 23, 2017 02:05 AM2017-03-23T02:05:27+5:302017-03-23T02:05:27+5:30
महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसची विधानसभेची वाटही अधिक कठीण झाली आहे.
एकाही विधानसभेत नाही मताधिक्य : मनपा पराभवाने घसरला ग्राफ
कमलेश वानखेडे नागपूर
महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसची विधानसभेची वाटही अधिक कठीण झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शहरातील सहाही जागा मोठ्या फरकाने गमावल्या. महापालिका निवडणुकीत काहीसे कमबॅक होईल व याचा फायदा विधानसभेत होईल, अशी काँग्रेस नेत्यांना अपेक्षा होती. मात्र, यावेळीही काँग्रेसचे फासे उलटेच पडले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नागपुरात खाते उघडण्यासाठी काँग्रेसला खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. महापालिका निवडणुकीत मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहता भाजपाला विधानसभा मतदारसंघात किमान २५ ते ५० हजारांपर्यंतचे मताधिक्य मिळाले आहे. विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुकांची आकडेवारी पाहता पूर्व व दक्षिण-पश्चिम नागपूर हे दोन मतदारसंघ भाजपचा गड म्हणून नावारुपास आले आहेत. गेल्या निवडणुकीत तर दक्षिण नागपूरने भाजपला एकतर्फी झुकते माप दिले. भाजपचे आ. सुधाकर कोहळे हे तब्बल ४३ हजार २१४ मतांनी विजयी झाले होते. महापालिका निवडणुकीचा विचार करता भाजपचे सर्वाधिक २२ नगरसेवक पूर्व नागपुरातून विजयी झाले आहेत. नगरसेवकांना मिळालेले मताधिक्य आ. कृष्णा खोपडे यांना सुखावणारे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण- पश्चिम मतदारसंघातही भाजपाचे तब्बल २१ नगरसेवक विजयी झाले आहेत.