विधिमंडळ सचिवालय सोमवारपासून : १६ पासून अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 07:53 PM2019-12-06T19:53:01+5:302019-12-06T19:55:11+5:30
हिवाळी अधिवेशनला येत्या १६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मुंबई विधिमंडळातील कर्मचारी व आवश्यक कागदपत्र नागपुरात पोहोचले आहेत. शुक्रवारी जवळपास ५०० कर्मचारी दाखल झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळी अधिवेशनला येत्या १६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. मुंबई विधिमंडळातील कर्मचारी व आवश्यक कागदपत्र नागपुरात पोहोचले आहेत. शुक्रवारी जवळपास ५०० कर्मचारी दाखल झाले. उद्या व परवा अधिकारीही दाखल होतील. येत्या सोमवारपासून विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरु होईल.
हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरु आहे. सोमवारपासून विधिमंडळ सचिवालयातील सुरक्षारक्षक विधानभवनाचा ताबा घेतील. सचिवालयाच्या कामकाजाला सुरूवात होईल. विधानसभा अध्यक्षांकडून हिवाळी अधिवेशनाची घोषणा झाल्यापासून येथील स्थानीक प्रशासनाच्या कामालाही गती आली आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी तयारी व सुरक्षेचा आढावाही घेतला. सोमवारी ९ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर व उपसभापती निलम गोºहे यांच्याकडून विधीमंडळ अधिवेशनाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुंबईहून विधिमंडळ सचिवालयातील बहुतांश कर्मचारी नागपुरात पोहोचले. त्यांच्यासह महत्त्वाची विविध कागदपत्रे, फायलीही ट्रकच्या माध्यमातून पोहचले असून, विधीमंडळात फाईली, कागदपत्रे लावणे सुरू करण्यात आली आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसात संपूर्ण कामे आटोपली जातील आणि सोमवारपासून सचिवालयाच्या कामाला सुरुवात होईल.