विधिमंडळ सचिवालयाचे १० डिसेंबरपासून नागपुरात कामकाज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 08:13 PM2022-11-09T20:13:14+5:302022-11-09T20:17:38+5:30
आजपासून आमदारांचे प्रश्न ऑनलाईन स्वीकारणार
नागपूर: तब्बल तीन वर्षांनंतर नागपुरात १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होऊ घातले आहे. त्यामुळे विदर्भातील आमदारांसह विविधमंडळ कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह आहे. प्राप्त माहितीनुसार १० डिसेंबरपासून विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज नागपुरात सुरू होईल. यासाठी विधिमंडळ कर्मचारी, विधिमंडळ सुरक्षारक्षकांचा ताफा व आवश्यक कागदपत्रे ९ डिसेंबरपर्यंत नागपुरात दाखल होत आहेत. नागपूरचे हिवाळी अधिवेशन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. या अधिवेशनात विशेषत: विदर्भाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदारांनी तयारी चालवली आहे. विधिमंडळ सचिवालयाने गेल्यावर्षीपासूनच प्रश्न व लक्षवेधी ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. हिवाळी अधिवेशनासाठी आज, गुरुवार, १० नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने प्रश्न स्वीकारले जाणार आहेत. लक्षवेधी १४ डिसेंबरपासून स्वीकारल्या जातील.
प्राप्त माहितीनुसार, ९ डिसेंबर रोजी मुंबईहून सुमारे तीन ट्रक भरून फाईल्स व साहित्य नागपुरात दाखल होईल. यासोबतच विधिमंडळ सुरक्षा कर्मचारी ९ डिसेंबर रोजी दुपारी विधिमंडळाच्या परिसराचा ताबा घेतील. याच दिवशी स्थानिक पोलीस अधिकारी यांच्यासोबत सुरक्षा नियोजनाबाबत बैठकही होईल.
आमदारांच्या शिफारशीवर कितीजणांना प्रवेश ?
नव्याने स्थापन झालेले शिंदे-फडणवीस सरकार, विरोधकांचा आक्रमकपणा व एकूणच राज्यातील राजकीय वातावरण पाहता नागपूर अधिवेशनात नेत्यांसह कार्यकर्त्यांची लगबग असेल. त्यामुळे विधिमंडळ परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यावेळी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. आमदारांच्या स्वीय सहायकाशिवाय त्यांच्या शिफारशींवर एका दिवशी कितीजणांना प्रवेश द्यायचा, प्रवेश द्यायचा की नाही, याबाबत कडक निर्णय घेतला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
सभापती, अध्यक्ष १५ नोव्हेंबरला घेणार आढावा
अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येत्या १५ नोव्हेंबर रोजी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नागपुरात येत आहेत. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत व इतर अधिकारीही सोबत असतील. प्रशासकीय तयारी, सुरक्षा व्यवस्था यांसह सर्व बाबींचा आढावा घेतला जाईल.