नागपुरात विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सोमवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:07 PM2018-06-22T22:07:16+5:302018-06-22T22:20:07+5:30
येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी सध्या जोमात सुरू आहे. विधिमंडळ सचिवालय येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी सध्या जोमात सुरू आहे. विधिमंडळ सचिवालय येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे.
यंदाचे अधिवेशन हे पावसाळी असल्याने पावसापासून बचाव करण्याच्या दृष्टीनेच संपूर्ण तयारी सुरू आहे. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी गेल्याच आठवड्यात तयारी संबंधात आढावा घेतला होता. त्यानुसार विधानभवन परिसर हा संपूर्णपणे ‘रेनप्रुफ’ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसारच तयारी सुरू आहे. यंदा रंगरंगोटीचे काम जास्त नाही. कारण हिवाळी अधिवेशनातच रंगरंगोटी झाली. देखभल दुरुस्ती व पावसापासून संरक्षण यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यासाठी विधानभवनाच्या मुख्य गेटपासून ते इमारतीपर्यंत शेड टाकण्यात येत आहे. मुख्यमंत्री ज्या गेटने आपल्या कक्षात प्रवेश करतात त्या बाजूनेही टिनाचे शेड उभारले जात आहे. याशिवाय विधानभवन परिसरातील विविध राजकीय पक्षांची कार्यालये सुद्धा रेनप्रूफ केली जात आहेत. विधिमंडळ सचिवालयातील काही कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. कार्यालयांमध्ये फाईल लावणे व कॉम्प्युटर लवण्यात आले आहे. इतर कार्यालयांमध्येही कामे सुरू आहेत.
रविभवन, नागभवन आमदार निवास रेनप्रूफ
अधिवेशनसाठी येणारे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, आमदार आणि अधिकारी वर्गाच्या निवासस्थानाच्या ठिकाणी सुद्धा पावसापासून सुरक्षेची संपूर्ण तयारी केली जात आहे. रविभवन, नागभवनातील कॉटेजसमोर शेड उभारले जात आहेत. यासोबतच आमदार निवास परिसरातही जोरात तयारी सुरू आहे. आमदार निवासाच्या दोन्ही इमारतीमध्ये कायमस्वरूपी लोखंडी शेड उभारले जात आहे.
सर्पमित्र तैनात
पावसाचे दिवस पाहता विधानभवन परिसर, रविभवन, नागभवन, आमदार निवासासह अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी साप निघण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सर्पमित्रांची मदत घेतली आहे. विधानभवन परिसरात तयारी करीत असताना साप निघण्याच्या घटना घडतही असतात. याही वेळी साप निघाला होता. त्यामुळे आवश्यक खबरदारी म्हणून सर्पमित्र तैनात करण्यात आल्याचे सांगितले जाते.
‘देवगिरी’वर चंद्रकांत पाटलांचाच दावा?
नागपुरात अधिवेशन असेल तेव्हा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीनंतर सर्वाधिक आकर्षणाचा बंगला म्हणजे ‘देवगिरी’च असतो. आजवर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुक्काम देवगिरीवर राहिलेला आहे. देवगिरीवर मुक्काम म्हणजे मुख्यमंत्र्यांनंतरचे मंत्री अशी आजवरची ओळख राहिलेली आहे. त्यामुळे देवगिरीवर मुक्कामास राहणे हे एकप्रकारचे ‘स्टेटस’सुद्धा मानले जाते. महाराष्ट्रात सध्या उपमुख्यमंत्रिपद नाही. चंद्रकांतदादा पाटील हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यामुळे देवगिरीवर त्यांचाच दावा केला जात आहे. सध्या मंत्र्यांना निवासस्थाने वितरित झालेली नाहीत. तरीही देवगिरी बंगल्यावर ज्या जोमाने तयारी सुरू आहे, त्यावरून हा बंगला कुणाला मिळतो, याची प्रतीक्षा आहे.