विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : आदित्य ठाकरे खोली क्रमांक २६९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:16 AM2019-12-14T00:16:48+5:302019-12-14T00:18:14+5:30

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे राहतील. तर त्यांचा मुलगा आ. आदित्य ठाकरे यांना राहण्यासाठी आमदार निवासातील खोली क्रमांक २६९ वितरित करण्यात आली आहे.

Legislature Winter Session: Aditya Thackeray Room No. 269 | विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : आदित्य ठाकरे खोली क्रमांक २६९

विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : आदित्य ठाकरे खोली क्रमांक २६९

Next
ठळक मुद्देराहणार कुठे रामगिरी की आमदार निवास ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील विधिमंडळाच्या सभागृहात नाते मंडळी असलेले अनेक जण आहेत. परंतु वडील मुख्यमंत्री आणि मुलगा आमदार असल्याचे चित्र यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे राहतील. तर त्यांचा मुलगा आ. आदित्य ठाकरे यांना राहण्यासाठी आमदार निवासातील खोली क्रमांक २६९ वितरित करण्यात आली आहे. परंतु ते आमदार निवासात राहतील की, वडिलांसोबत रामगिरी येथे राहतात किंवा दोन्ही ठिकाणी न राहता एखाद्या हॉटेलमध्ये राहणे पसंद करतात, याकडे लक्ष लागले आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी तयारी पूर्ण झाली आहे. मंत्र्यांना रविभवनातील कॉटेज वितिरत करण्यात आले असून आमदारांनाही आमदार निवासातील खोल्या वितरित झालेल्या आहेत. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना १ क्रमांकाची खोली मिळाली आहे. इमारत क्रमांक १ मधील तळमजल्यावर ही खोली असून त्यांच्या रांगेतच माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना खोली क्रमांक ३, आ. जोगेंद्र कवाडे खोली क्रमांक ६, माजी मंत्री सुभाष देशमुख १३ आणि आ. धनंजय मुंडे यांना १९ क्रमांकाची खोली मिळाली आहे. शिवसेना नेते आ. आदित्य उद्धव ठाकरे यांना आमदार निवासातील इमारत क्रमांक ३ मधील दुसऱ्या माळ्यावर असलेली २६९ क्रमांकाची खोली वितरित करण्यात आली आहे. त्यांच्या शेजारीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रकाश गजभिये हे २७१ क्रमाकांच्या खोलीत राहतील. याच इमारतीत पहिल्या माळ्यावर रोहीत पवार यांना १७८ व प्रवीण दरेकर यांना १७९ क्रमांकाची खोली मिळाली आहे.
रविभवन-नागभवन रिकामे
आतापर्यंत केवळ ७ मंत्री आहेत. खातेवाटप झाले असून त्यांना कॉटेजही वितिरत झाले आहेत. एकनाथ शिंदे यांना रविभवन परिसरातील कॉटेज १, सुभाष देसाई यांना कॉटेज क्रमांक २, जयंत पाटील यंना कॉटेज क्रमांक ३, छगन भुजबळ यांना कॉटेज क्रमांक ४, बाळासाहेब थोरात यांना कॉटेज क्रमांक ५, नितीन राऊत यांना कॉटेज क्रमांक ६ यांच्यासह विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना कॉटेज क्रमांक १८, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कॉटेज १७ आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांची कॉटेज क्रमांक २० येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ ९ कॉटेज वितरित झाले असून रविभवनात बहुतांश कॉटेज रिकामेच आहेत. नागभवन येथे राज्यमंत्र्यांची निवास व्यवस्था केली जाते. परंतु सध्या एकही राज्यमंत्री नाही. त्यामुळे येथील सर्व कॉटेज खाली आहेत.
पृथ्वीराज चव्हाण १०२ तर अशोक चव्हाण ७ क्रमांकाच्या खोलीत राहणार
यंदाच्या विधानसभेत तीन माजी मुख्यमंत्री निवडून आले आहेत. यात आ. देवेंद्र फडणवीस यांच्यासह आ. पृथ्वीराज चव्हाण व आ. अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. यापैकी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या विरोधी पक्ष नेते असून त्यांची निवास व्यवस्था ही रविभवन परिसरातील विरोधी पक्ष नेत्यांच्या कॉटेजमध्ये कुटीर क्रमांक २९ मध्ये करण्यात आली आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचा सध्या मंत्रिमंडळात समावेश नसल्याने त्यांची निवासव्यवस्था आमदार निवासातच करण्यात आली आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना इमारत क्रमांक १ मधील पहिल्या माळ्यावर असलेली १०२ क्रमांकाची खोली वितरित करण्यात आली असून आ. अशोक चव्हाण यांना याच इमारतील तळमजल्यावर असलेली ७ क्रमांकाची खोली मिळाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतीला दिलीप वळसे पाटील (१०१), अजित पवार(१०३), रामदास कदम (१०४), परिणय फुके (१०५), चंद्रकांत पाटील (१०९) आणि विजय वडेट्टीवार (११०) राहतील.
माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना याच इमारतीतील चौथ्या माळ्यावर असलेली ४११ क्रमांकाची खोली वितरित करण्यात आली आहे. याच माळ्यावर गिरीश महाजन ४०६ व विनायक मेटे हे ४२१ क्रमांकाच्या खोलीत राहतील. तर याच इमारतीतील तिसऱ्या माळ्यावर ३०७ क्रमांकाची खोली नितेश राणे यांना व ३२२ क्रमांकाची खोली धीरज देशमुख यांना वितरित झाली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांना २९ क्रमांकाची खोली
माजी विरोधी पक्ष नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना इमारत क्रमांक २ मधील तळमजल्यावर असलेल्या २९ क्रमांकाची खोली मिळाली आहे. त्यांच्या रांगेतच माजी मंत्री महादेव जानकर यांना ३१ क्रमांकाची खोली मिळाली आहे. याच इमारतीत पहिल्या माळ्यावर माजी मंत्री आशिष शेलार यांना १३० क्रमांकाची खोली मिळाली आहे. याच माळ्यावर माजी मंत्री दिवाकर रावते यांना १४० क्रमांकाची खोली मिळाली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनासुद्धा याच इमारतीतील दुसऱ्या माळ्यावरील २३८ क्रमांकाची खोली मिळाली आहे.
सर्व महिला आमदार राहणार एकाच रांगेत
इमारत क्रमांक १ मधील दुसऱ्या माळ्यावर सर्व महिला आमदारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २०१ ते २२८ क्रमांकाच्या खोल्या या त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Web Title: Legislature Winter Session: Aditya Thackeray Room No. 269

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.