हक्कदार स्त्री लेखिकांना अध्यक्ष पदापासून डावलले गेले : अरुणा ढेरे यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:53 PM2019-01-14T23:53:20+5:302019-01-14T23:55:06+5:30
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद महत्त्वाचे आहे व योग्य अशी निर्मिती करणारे स्त्री किंवा पुरुष साहित्यिक कुणालाही ते मिळायला पाहिजे. यामध्ये स्त्री किंवा पुरुष असा विचार करता कामा नये. मात्र तो करावा लागतो; कारण अशा अनेक स्त्री लेखिका या पदावर हक्क सांगण्याच्या योग्यतेच्या होत्या, पण त्यांना हे पद मिळाले नाही. मालती बेडेकर, सरोजिनी वैद्य अशी कितीतरी नावे घेता येतील ज्यांचे त्या पदावर हक्क होते व ज्यांनी साहित्याची उत्तम निर्मिती केली होती, मात्र त्या संमेलनाच्या अध्यक्षपदापासून वंचित राहिल्याची खंत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी सोमवारी प्रकट मुलाखतीत व्यक्त केली व अप्रत्यक्षपणे या क्षेत्रातही कसा भेदभाव होत असल्याची टीका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद महत्त्वाचे आहे व योग्य अशी निर्मिती करणारे स्त्री किंवा पुरुष साहित्यिक कुणालाही ते मिळायला पाहिजे. यामध्ये स्त्री किंवा पुरुष असा विचार करता कामा नये. मात्र तो करावा लागतो; कारण अशा अनेक स्त्री लेखिका या पदावर हक्क सांगण्याच्या योग्यतेच्या होत्या, पण त्यांना हे पद मिळाले नाही. मालती बेडेकर, सरोजिनी वैद्य अशी कितीतरी नावे घेता येतील ज्यांचे त्या पदावर हक्क होते व ज्यांनी साहित्याची उत्तम निर्मिती केली होती, मात्र त्या संमेलनाच्या अध्यक्षपदापासून वंचित राहिल्याची खंत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी सोमवारी प्रकट मुलाखतीत व्यक्त केली व अप्रत्यक्षपणे या क्षेत्रातही कसा भेदभाव होत असल्याची टीका केली.
विदर्भ साहित्य संघाच्या ९६ व्या वर्धापन दिन समारोहांतर्गत डॉ. अरुणा ढेरे यांचा सत्कार आणि प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली. यवतमाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या वादग्रस्त पार्श्वभूमीच्या कारणामुळे या समारोहाबाबत उत्सुकता होती, मात्र हा वाद वि.सा.संघाच्या समारोहात सोयीस्करपणे टाळण्यात आला. या समारोहात अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. विद्या देवधर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. विकास सिरपूरकर यांच्यासह वि.सा.संघाचे कार्याध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले पाटील, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी असे महामंडळाच्या चारही घटक संस्थांचे प्रतिनिधी एकत्रित उपस्थित होते; सोबत मुंबई संस्थेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
म्हैसाळकर यांच्या हस्ते सत्कारानंतर डॉ. वंदना बोकील-कुळकर्णी यांनी संचालित केलेल्या मुलाखतीत डॉ. अरुणा ढेरे यांनी समंजसपणाने उत्तरे दिली. अस्वस्थ वर्तमानाबाबत संवादावर फार विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या. असे अनेक लोक आहेत ज्यांनी वेदना सहन केल्या, मात्र आक्रोश करणाऱ्यांच्या वेदना माझ्या वाट्याला आल्या नाही. मात्र आरडाओरड करण्यापेक्षा शांतपणे काही गोष्टी करता येतात, असे मला वाटते. स्वत:मधील मूल्यांना, निष्ठांना बाहेरच्या गढूळपणाचा धक्का न लागू देता संवादातून माणूस बदलण्याची प्रक्रिया शक्य असल्याचे त्या म्हणाल्या. जागतिकीकरणात खूप हिंसक, पाशवी अशा गोष्टी प्रक र्षाने जाणवतात.
मुलांमध्ये वाचन संस्कृतीसाठी योजना
अध्यक्षपद जाहीर झाल्यानंतर महिनाभर समजून घेण्यात आणि त्यानंतर निर्माण झालेला वाद निस्तरण्यात गेला. त्यामुळे
संमेलनाध्यक्षांच्या निधीबाबत विचार केला नाही. मात्र विद्यार्थी व मुलांमध्ये वाचनसंस्कृती वाढण्यासाठी शाश्वत काही करण्याचा मानस आहे. पालकांनी चांगले मराठी साहित्य वाचावे व मुलांसमोर किंवा सोबतही चर्चा करावी. याशिवाय शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून मुलांना याची गोडी लावावी, यासाठी पालक व शिक्षकांशी संवाद साधणार असल्याचे त्या म्हणाल्या. मुलांपर्यंत चांगले साहित्य देण्यासाठी काही निर्मिती व बांधकाम करता येते का, याचाही विचार करणार आहे. ग्रामीण व शहरात राबविण्यात येणारे वेगवेगळे प्रयोग योजना रूपात आणता येतात का, याचाही विचार करणार असल्याचे डॉ. अरुणा ढेरे यांनी सांगितले.
चांगल्या लोकांच आवाज एकत्रित व मोठा नसला तरी चांगलेपणावरचा विश्वास टिकविणारा असल्याची भावना त्यांनी मांडली. बायोपिक चित्रपटाबद्दल त्या म्हणाल्या, साहित्यांचे माध्यमांतर होताना दोन माध्यमांच्या समन्वयातून प्रश्न निर्माण होतात. अशावेळी या माध्यमांतरात जो माणूस हात घालतो त्याची समज, विश्वसनीयता तपासणे गरजेचे आहे.
वडिलांची आठवण सांगताना, वडिलांचा वारसा मिळाला, मात्र त्यांनी हात धरून लिहायला सांगितले नाही. ते आपोआप दैववत मिळत गेले. मी सुरुवातीपासून सार्वजनिक जीवनात रमणारी होते, अशावेळी त्यांनी बंधन न लादता जबाबदारीची जाणीव देत स्वातंत्र्याचा छान अर्थ समजविल्याचे मनोगत त्यांनी मांडले. कवयित्री म्हणून समाधान जास्त आहे. कविता हा मनातील अमूर्त आशय व भावनांचा पहिला भाषिक अनुवाद आहे. त्यातल्या बहुतेक गोष्टी आपण कवटाळण्याचा प्रयत्न करतो, पण बरेच काही निसटून जाते. हे शब्द आपल्याशी खेळ करतात आणि आपण तडफडत राहतो. कलावंताला वरही असतो आणि शापही असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. व्यक्ती आणि लेखिका म्हणून वेगळी नाही. हा माझ्या आतलाच आवाज असल्याचेही त्या म्हणाल्या. आताच्या सगळ्याच साहित्याबाबत संवेदनशीलता वाढली आहे. साहित्याच्या कुठल्या पातळीवर वाद निर्माण होईल, हे सांगता येत नाही. वाङ्मय बाह्य कारणांनी गाजविले जाते. त्यामुळे वाचकांनी बाह्य गोष्टींच्या प्रभावाने गढूळ न होता स्वत:ची शक्ती जागवावी. या गढूळपणाविरुद्ध आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
वेगवेगळ्या सत्राचे संचालन प्रकाश एदलाबादकर, सीमा शेटे व प्रा. नितीन सहस्रबुद्धे यांनी केले.
यांना मिळाले वाङ्मय पुरस्कार
वर्धापन दिनानिमित्त १९ वाङ्मय पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये डॉ. वा. वि. मिराशी स्मृती वैचारिक वाङ्मय पुरस्कार श्रीपाद कोठे यांना, पु.य. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार सुप्रिया अय्यर यांना अण्णासाहेब खापर्डे स्मृती आत्मचरित्र पुरस्कार डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय कवी इरफान शेख यांना शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती काव्यलेखन पुरस्कार, डॉ. विजया फडणीस यांना डॉ. य.खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार, डॉ. अमृता इंदूरकर यांना कुसुमानिल स्मृती समीक्षा लेखन पुरस्कार व वसंत वाहोकार यांना वा.कृ. चोरघडे स्मृती कथा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इतर पुरस्कारांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विशेष पुरस्कार शेखर सोनी, डॉ. मा.गो. देशमुख स्मृती संत साहित्य पुरस्कार डॉ. प्रमोद गारोडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती पुरस्कार डॉ. संजय नाथे, संत गाडगेबाबा स्मृती पुरस्कार गंगाधर ढोबळे, नवोदित साहित्य लेखन पुरस्कार अविनाश पोईनकर व संघमित्रा खंडारे, विशेष पुरस्कार प्रमोद वडनेरकर व डॉ. प्रवीण नारायण महाजन, हरिकिसन अग्रवाल स्मृती पत्रकारिता बरखा माथूर, कविवर्य ग्रेस स्मृती युगवानी लेखन पुरस्कर दा.गो. काळे, शांताराम कथा पुरस्कार हृषिकेश गुप्ते व उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार बुलडाणा शाखेला प्रदान करण्यात आला.