आश्रमशाळेतील लिंबू, मिरची गावकऱ्यांनी काढले
By admin | Published: December 26, 2014 12:56 AM2014-12-26T00:56:27+5:302014-12-26T00:56:27+5:30
तालुक्यातील पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर भूतबाधा रोखण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारासह प्रत्येक खोलीत लावण्यात आलेले लिंबू, मिरची गुरूवारी
घेतली बैठक : समस्यांचा वाचला पाढा
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर भूतबाधा रोखण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारासह प्रत्येक खोलीत लावण्यात आलेले लिंबू, मिरची गुरूवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढून टाकण्यात आले.
२५ डिसेंबरच्या ‘लोकमत’मध्ये या संदर्भातील वृत्त झळकताच प्रशासनाने गंभीर दखल घेतली. शाळेचे मुख्याध्यापक एस. डब्ल्यू. खेडेकर यांनी शाळेत ग्रामस्थांची बैठक आयोजित केली. अंधश्रध्देच्या या घृणास्पद प्रकाराबाबत यावेळी गंभीर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थ, मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुढाकार घेऊन सर्व लिंबू-मिरची काढून टाकले. या बैठकीला ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष भारत चौधरी, उपाध्यक्ष बाजीराव आत्राम, गुरूपल्ली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुनीता तलांडे, पंदेवाही येथील शत्रू गावडे, कटिया गावडे, मालू गावडे, गिल्ला आत्राम, जगन्नाथ मडावी, अनिल कोसवे, संजय दंडीकवार, रमा अलोणे आदी उपस्थित होते. हा प्रकार अंधश्रध्देपोटी नव्हे तर ग्रामदेवता माऊली यांच्यावर श्रध्दा ठेवून करण्यात आला, असे यावेळी अध्यक्ष भारत राऊत यांनी सांगितले. मुख्याध्यापक खेडेकर यांनी झालेली चूक मान्य केली. गावकऱ्यांनी यावेळी शाळेच्या विविध समस्या विशद केल्या. (तालुका प्रतिनिधी)